

मालाड: मढ मार्वे रोड वर मास्तरवाडी, अक्सा गाव परिसरात मंगळवारी (दि. २१ ऑक्टोबर २०२५) रात्रीच्या सुमारास ८.१५ वाजता भीषण अपघात झाला. मार्वे कडून अक्सा कडे जाणाऱ्या बेस्ट बसने समोरून येणाऱ्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. या मोटरसायकलवर चौघे सदस्य असलेले एक कुटुंब बसलेले होते.
मोटरसायकलवरील आठ वर्षांची चिमुरडी पिहू सुनील कंकालिया व तिची आई ज्योती सुनील कंकालिया (वय ४२) या दोघी गंभीर जखमी झाल्या. तातडीने त्यांना उपचारासाठी शताब्दी रुग्णालय, कांदिवली (पश्चिम) येथे हलविण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासून दोघींनाही मृत घोषित केले.
या दुर्दैवी घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतांच्या नातेवाईक सुनील कंकालिया यांच्या तक्रारीवरून मालवणी पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिस उपनिरीक्षक काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
या अपघातात मयत महिलेचे पती आणि दुसरी मुलगी सुखरूप असल्याची पोलिसांनी माहिती दिली.