

पुणे: गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरात आरोग्याच्या तक्रारी झपाट्याने वाढल्या आहेत. रात्रभर कोसळणारा पाऊस, दिवसभर ढगाळ वातावरण आणि सूर्यप्रकाशाचा अभाव, यामुळे ताप, सर्दी-खोकला, डेंग्यू, पोटाचे विकार तसेच बुरशीजन्य आजारांचे प्रमाण वाढले आहे. ताप, खोकला, सर्दीसह त्वचेवर लालसर डाग, खाज सुटणे, ॲलर्जी अशा तक्रारी घेऊन रुग्ण मोठ्या संख्येने दवाखान्यांकडे धावत आहेत.
पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याने आणि हवेत वाढलेल्या आर्द्रतेमुळे डासांची पैदास तर होतेच; पण बुरशीजन्य आजारांचाही प्रसार वेगाने होतो. डेंग्यू, मलेरिया, व्हायरल फिव्हर याबरोबरच रिंगवर्म, फंगल इन्फेक्शन, ॲथलीट्स फूट यांसारख्या तक्रारीही वाढत आहेत. नागरिकांनी घरातील कपडे, टॉवेल्स स्वच्छ व कोरडे ठेवावेत, वेळेवर उपचार घ्यावेत, असे जनरल फिजिशियन डॉ. रोहन शहा यांनी सांगितले. (Latest Pune News)
मुलांमध्ये संसर्गजन्य आजार झपाट्याने वाढत आहेत. गेल्या काही दिवसांत ताप, सर्दी-खोकला, उलट्या-जुलाब यांसाठी मुलांना रुग्णालयात आणण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच त्वचेवर चट्टे, खाज येणे यांसारख्या बुरशीजन्य तक्रारीही दिसत आहेत. पालकांनी मुलांची स्वच्छता राखावी, पावसात भिजल्यास लगेच कपडे बदलून कोरडे करावेत, असे बालरोगतज्ज्ञ डॉ. अनघा पाटील यांनी सांगितले.
मंदिरांमध्ये, दांडियाच्या कार्यक्रमांसाठी सध्या मोठी गर्दी होत आहे. सर्दी-खोकला असलेल्या रुग्णांनी गर्दीत जाणे टाळावे. सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरावा आणि स्वतःहून औषधे न घेता वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. संसर्ग रोखण्यासाठी योग्य वेळी तपासणी आणि निदान होणे महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी सांगितले.
कोणत्या आजारांचा प्रादुर्भाव?
डेंग्यू, चिकुनगुनिया असे कीटकजन्य आजार
टायफॉईड, काविळीसारखे
जलजन्य आजार
बुरशीजन्य आजार : त्वचारोग, डोळ्यांचा, कानांचा संसर्ग
काय काळजी घ्यावी?
परिसरात पाणी साचू देऊ नका
आठवड्यातून एकदा टाक्या, डूम स्वच्छ धुवा.
पावसात भिजल्यावर लगेच कोरडे कपडे घाला.
डासप्रतिबंधक उपाय वापरा, पूर्ण बाह्यांचे कपडे घाला.
नखांखालील व त्वचेवरील बुरशीजन्य चट्ट्यांवर दुर्लक्ष करू नका, त्वरित उपचार घ्या
स्वच्छ, उकळलेले पाणी प्या
बाहेरील अन्न शक्यतो टाळा.
ताप, अंगदुखी, खोकला वाढल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा आणि वैयक्तिक स्वच्छता पाळा.