पुणे: रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांचे अतिक्रमण कमी करण्यासाठी त्यांना शहरातील काही भागांत महापालिकेच्या जागेवर मंडई व भवन विभागाच्या माध्यमातून मंडई बांधून देण्यात आल्या आहेत. मात्र, काही मंडईंचे काम पूर्ण झालेले नाही, तर काहींचे काम पूर्ण होऊनही त्या मंडई विभागाने ताब्यात न घेतल्याने या इमारती वापराअभावी पडून असल्याची धक्कादायक माहिती ‘पुढारी’ने केलेल्या पाहणीत आढळून आली आहे.
या अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतीत अनेक गर्दुल्ले व मद्यपींचा वावर वाढला आहे. तसेच, महापालिकेचा कोट्यवधींचा खर्च वाया गेला आहे. हक्काची जागा नसल्याने बाजी विक्रेते रस्त्यावरच बसत असल्याने वाहतूक कोंडी आणि अपघात वाढले आहेत. (Latest Pune News)
कोथरूड येथील श्रीमती सुमनताई रामचंद्र माथवड भाजी मंडईचे नूतनीकरण म्हणजे भाजी विक्रेत्यांच्या दृष्टीने माजी महापौरांनी दाखविलेले दिवास्वप्नच ठरले आहे. गेली पाच-सहा वर्षे येथील भाजी विक्रेते चकाचक मंडई व त्यातील नवीन गाळ्यांची प्रतीक्षा करीत आस लावून बसले आहेत आणि त्यांच्या भाजी मंडईच्या जागेवर उभारण्यात आलेली मंडईची इमारत जुगाराचा व गर्दुल्ल्यांचा अड्डा बनली आहे.
पाच-सहा वर्षांपूर्वी या मंडईच्या ठिकाणी सर्व सोयी-सुविधायुक्त अशा अत्याधुनिक मंडई उभारणीचा प्रस्ताव तत्कालीन नेत्यांनी ठेवला. मंडईच्या पत्र्याच्या शेडमध्ये व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांनी चांगले गाळे व सुविधा मिळतील, या आशेने त्याला अनुमती दिली व रस्त्याकडेला दिलेल्या तात्पुरत्या जागेत स्थलांतरित झाले.
गेल्या पाच वर्षांत पत्र्याच्या शेडच्या जागेवर सिमेंट काँक्रीटची तीनमजली इमारत तर उभी राहिली; पण गाळे तयार करण्याचे काम काही पुढे गेले नाही. या इमारतीतीत पहिल्या दोन मजल्यांवर भाजी विक्रेत्यांसाठी गाळे तयार करण्यात येत असून, तिसऱ्या मजल्यावर स्व. लोकनेते गोपीनाथ मुंडे बहुउद्देशीय हॉलची निर्मिती करण्यात येणार आहे.
मात्र, व्यावसायिकांसाठी बांधण्यात येत असलेल्या गाळ्यांचा आकार अत्यंत लहान असल्याने व्यावसायिकांनी त्यास विरोध केला आहे. गाळ्यांचा आकार किमान सहा-सात फुटांचा तरी हवा, असे येथील भाजी विक्रेत्यांचे मत आहे. तशी मागणीही त्यांनी पालिका अधिकाऱ्यांकडे केली आहे. परंतु, त्यात अद्याप काहीही प्रगती झाली नसल्याने व्यावसायिक नाराज आहेत. दहा-बारा पायऱ्या चढून ग्राहक भाजी खरेदीसाठी कसे येतील तसेच पहिल्या मजल्यावरही भाजीसाठी कसे जातील, याबाबतही विक्रेते साशंक आहेत.
दुर्गंधी व घाणीचे सामाज्य
गेली काही वर्षे धूळ खात पडून असलेल्या या इमारतींमुळे परिसरात दुर्गंधी व घाणीचे सामाज्य पसरले आहे. इमारतीच्या तळमजल्यावर पार्किंगच्या जागेत पाणी साठून राहिल्याने डास व रोगराई पसरत आहे, तर इमारतीत पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर जागोजागी पांघरुण टाकून ठेवलेली आढळतात. या जागेत रात्री नशेखोरांचा अधिक वावर असतो, अशी तक्रारही अनेकांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना केली.
कोथरूड येथील माथवड मंडईचे काम काही वर्षांपासून सुरू आहे. स्थानिक भाजी विक्रेत्यांचा मंडईत गाळ्याच्या जागेवर आक्षेप होता. ही जागा कमी असल्याने येथे भाजी व्यवसाय करणे शक्य नसल्याचे त्यांचे म्हणणे होते. त्यामुळे हे काम रखडले. सुरुवातीला येथे 101 गाळे बांधले जाणार होते. मात्र, काही दिवसांपूर्वी मंडई विभाग व भाजी विक्रेत्यांची बैठक होऊन येथे 78 गाळे बांधण्याचे मंजूर झाले आहे. त्यामुळे नव्याने गाळे बांधण्यात येत आहेत. सध्या जसे बजेट येईल तसे काम सुरू आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी प्रशासकीय मान्यता मिळाल्यावर निविदा काढण्यात येणार असून, त्यानंतर येत्या दोन ते तीन महिन्यांत हे काम पूर्ण केले जाणार आहे. नव्याने बांधण्यात येणारे गाळे हे 5 फूट 4 इंच बाय 7 फूट असे राहणार आहेत.
-रोहिदास गव्हाणे, भवन विभाग