

IAS Officer Transfer
पुणे : पुणे महापालिकेचे सध्याचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले हे या महिन्यात निवृत्त होणार असून त्यांच्या जागी आयुक्तपदी नवल किशोर राम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राम हे यापूर्वी पुण्याचे जिल्हाधिकारी होते. सध्या ते पंतप्रधान कार्यालयात कार्यरत असून ३१ मे ला ते आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.
नवल किशोर राम हे २००७ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. ते एक अनुभवी प्रशासक असून त्यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी असताना जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने बुधवारी (दि.२१) त्यांनी १० दिवसांनी पुणे आयुक्तपदाचा पदभार स्वीकारावा, असे आदेश पत्रकाद्वारे देण्यात आले. त्यानुसार ते ३१ मे रोजी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारणार आहेत. त्यांचे कामकाज व अनुभव लक्षात घेऊन पुणे महापालिकेच्या आयुक्तपदी त्यांची निवड करण्यात आली आहे.
नवल किशोर राम हे मूळचे बिहारमधील चंपारण जिल्ह्यातील मोतीहारी गावचे आहेत. सन २००७ मध्ये ते आयएएस झाले. राम यांची पहिली नियुक्ती नांदेड येथे झाली होती. त्यानंतर त्यांनी यवतमाळ जिल्हा परिषदेत दोन वर्षे काम केले. यानंतर ते बीड व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी झाले. २०२० मध्ये नवल किशोर राम हे पुण्याचे जिल्हाधिकारी होते. कोरोना काळात त्यांनी स्वतः गावोगावी जाऊन भेटी दिल्या होत्या. देशभरातील सर्वोत्तम जिल्हाधिकारी म्हणून देखील त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची थेट पंतप्रधान कार्यालयात उपसचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती. सध्या केंद्रीय प्रतिनियुक्तीवरून राज्य शासनाकडे रुजू झाल्यानंतर त्यांची नियुक्ती पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तपदी करण्यात आली.