

पुणे: शेतकर्यांनी मोठ्या कष्टाने फुलविलेल्या फुलांसाठी पैसे न मोजता ते फुकट उचलण्याचे प्रकार गुलटेकडी मार्केट यार्डातील फुलबाजारात वाढू लागले आहेत. मागील काही महिन्यांत फुकट्या तृतीयपंथीयांमुळे शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान होत असल्याने रविवारी एका व्यापार्याने फुकट फुले नेण्यास विरोध केला.
त्यानंतर तृतीयपंथीयांनी अश्लील वर्तन करत त्या व्यापार्यासमोर गोंधळ घातला. गोंधळाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने व्यापारी वर्गाकडून फुकट्या तृतीयपंथीयांना आवर घालण्याची मागणी होत आहे. (Latest Pune News)
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फुलबाजारात जिल्ह्यासह परराज्यातून विविध प्रकारची फुले दाखल होतात. यामध्ये, झेंडू, शेवंती, गुलछडी या सुट्ट्या फुलांपासून डच गुलाब, कार्नेशियन, जिप्सोफिला आदी शोभिवंत फुलांचा समावेश असतो. त्याच्या खरेदीसाठी शहराच्या विविध भागातून नागरिक येत असतात.
यामध्ये, बहुतांश तृतीयपंथी फुलविक्रीचा व्यवसाय करतात तर धार्मिक कार्यक्रमासाठी फुले खरेदी करण्यासाठी येणार्या तृतीयपंथीयांची संख्याही लक्षणीय आहे. ते पैसे देऊन फुलांची खरेदी करतात. त्यांपैकी बहुतांश जण नित्यनेमाने फुलांची खरेदी करीत असल्याने व्यापारी वर्गाशीही त्यांची चांगली ओळख आहे.
मात्र, सद्य:स्थितीत घोळक्याने येऊन महागडी फुले उचलण्याकडे तृतीयपंथीयांचा कल दिसून येतो. दररोज हा प्रकार सुरू असल्याने व्यापारी वर्गही मेटाकुटीला आला आहे. हे तृतीयपंथी बोगस असल्याचा संशय व्यापार्यांना असून त्यांच्याकडून महागडी फुले उचलून त्याची बाहेर विक्री करण्यात येत असल्याचा आरोपही होत आहे. बाजारात होत असलेल्या याप्रकारामुळे जे चांगले तृतीयपंथी आहेत ते बदनाम होत असल्याची भावना व्यापारी वर्गाकडून व्यक्त करण्यात आली.
फुलबाजारात घडलेल्या या प्रकाराची माहिती घेण्यात आली आहे. त्याबाबत वरिष्ठांनाही माहिती दिली असून तृतीयपंथीयांशी संबंधित संघटनेलाही याबाबत माहिती दिली आहे. फुलबाजारात दोन तृतीयपंथी सुरक्षारक्षक तैनात करण्यात येणार आहेत. जेणेकरून शेतकर्यांनी कष्टाने पिकविलेली फुले कोणीही फुकट घेऊन जाणार नाही.
- दादासाहेब कड, विभागप्रमुख, फुलबाजार.