

वडगाव निंबाळकर: साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होऊन तीन आठवड्यांचा कालावधी लोटला आहे. परंतु अद्याप निरा खो-यातील कारखान्यांनी ऊस दराची कोंडी फोडलेली नाही. ऊस उत्पादकांचे डोळे कारखान्यांच्या निर्णयाकडे लागले आहेत. सोमेश्वरने ३५०० रुपयांची उचल जाहीर करत ही कोंडी फोडावी, अशी मागणी बहुतांश शेतकऱ्यांंकडून होत आहे.
शेजारील सातारा जिल्ह्यातील श्रीराम फलटण, श्री दत्त साखरवाडी यांनी ३३०० रुपये दर जाहीर केल्यामुळे ऊस उत्पादकांमध्ये चर्चेला चांगलेच उधाण आले आहे. या जाहीर केलेल्या दरामुळे श्री सोमेश्वर, माळेगाव, छत्रपती आदी कारखान्यांना याचा फटका बसू शकतो. या कारखान्यांचा दर जाहीर नसल्याने व ऊस तोडीस विलंब करण्यापेक्षा एक रकमी ३३०० रुपये मिळतात तसेच हे कारखाने दिवाळीला साखर देत असल्याने अनेकांचा कल या कारखान्यांकडे आहे.
याशिवाय या कारखान्यांकडून त्वरित ऊस तोड मिळत असल्याने पुढील हंगाम साधण्यासाठी अनेक जण या कारखान्यांना ऊस देण्याच्या मानसिकतेत आहेत. ऊस परजिल्ह्यात गेल्यास निरा खोऱ्यातील साखर कारखान्यांना ऊस कमी पडू शकतो, अशी स्थिती आहे.
बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची एफआरपी ३ हजार २८५ रुपये प्रतिटन आहे. कारखाना ऊस दरात यंदाही कमी पडणार नाही, उच्चांकी दराची परंपरा कायम ठेवू, अशी ग्वाही यापूर्वीच कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली आहे. परंतु अद्याप दराची कोंडी फुटलेली नाही.
शेजारील माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत. लगतच्या इंदापूर तालुक्यातील छत्रपती कारखान्यावरही पवार यांचीच सत्ता आहे. पवार हे तीनही कारखाने ऊस दरात कमी पडणार नाहीत, अशी ग्वाही देत आहेत. परंतु, दर कधी जाहीर होतो याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याकडे एकरकमी ३ हजार ५०० रुपये प्रतिटनाप्रमाणे उचल द्यावी, अशी मागणी केली आहे. कारखान्याचे संचालक मंडळ ही मागणी पूर्ण करून शेतक-यांना न्याय देतील अशी अपेक्षा आहे.
कल्याण भगत, तालुकाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना