

पुणे : देशात ज्याप्रमाणे गणेशोत्सव साजरा करण्यात येतो, त्याच पद्धतीने पुढील दोन वर्षांत पुस्तकोत्सव साजरा करण्यात येईल. त्यादृष्टीने पुस्तक न्यासाचे काम सुरू आहे. सध्या पुणे, नागपूर, नाशिक, मुंबई आदी ठिकाणी होत असलेला हा पुस्तक महोत्सव देशभर पुस्तकोत्सव म्हणून येत्या काळात साजरा करण्यात येईल, अशी माहिती राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे अध्यक्ष युवराज मलिक यांनी दैनिक ‘पुढारी’शी बोलताना दिली.(Latest Pune News)
युवराज मलिक यांनी शुक्रवारी दैनिक ‘पुढारी’च्या कार्यालयाला भेट देत संपादकीय विभागाशी संवाद साधला. या वेळी दैनिक पुढारीचे निवासी संपादक सुनील माळी आणि महाव्यवस्थापक सुनील लोंढे यांनी त्यांचे स्वागत केले. महोत्सवाचे यंदाचे तिसरे वर्ष असून, 13 ते 21 डिसेंबरदरम्यान हा महोत्सव फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानात होणार आहे. यंदाच्या महोत्सवात ‘लिटरेरी फेस्ट’, ‘लेखक कट्टा’ आदी उपक्रम तर आहेतच, त्याशिवाय ‘जॉय ऑफ रीडिंग’ हे वेगळेपण असेल. वाचन संस्कृतीशी घट्ट वीण असलेल्या पुणेकरांना वाचन, साहित्य आणि संस्कृतीचा अद्वितीय संगम अनुभवता येणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे अध्यक्ष युवराज मलिक यांनी दैनिक ‘पुढारी’शी बोलताना दिली.
मलिक म्हणाले, ‘20 नोव्हेंबरनंतर यंदा पुस्तक महोत्सवाचे उद्घाटन कोण करणार, याचे नाव जाहीर करण्यात येणार आहे. पुस्तक महोत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि उपक्रमांची रेलचेल असेल. गेल्या वर्षी 690 स्टॉल होते. यंदा या महोत्सवात तब्बल 800 हून अधिक स्टॉल्स असतील. पुणेकरांच्या प्रतिसादामुळे या उपक्रमाने राष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. गेल्या वर्षी सुमारे आठ लाख पुणेकरांनी महोत्सवाला भेट देत 25 लाखांहून अधिक पुस्तकांची खरेदी केली होती, तर 20 ते 25 कोटींची उलाढाल झालेली दिसून आली. यंदाच्या नऊ दिवसांच्या महोत्सवात सहा दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. 16, 17 आणि 18 डिसेंबरला मराठी भाषेतील कार्यक्रम रंगणार असून, 19, 20 आणि 21 डिसेंबरला हिंदी, इंग््राजी आणि इतर भारतीय भाषांतील कार्यक्रम होणार आहेत. यामध्ये कन्नड भाषेतील लेखिका आणि नामांकित आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार विजेत्या बानू मुश्ताक यांच्यासह साधारण 200 बहुभाषिक वक्ते उपस्थितांना संबोधित करणार आहेत. पुणे जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना एसटीच्या माध्यमातून पुणे पुस्तक महोत्सव पाहण्यासाठी आमंत्रित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे देखील मलिक यांनी स्पष्ट केले.
भाषांतरीत पुस्तकांसंदर्भात महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थात बालभारतीबरोबर पुस्तक न्यासाने एक सामंजस्य करार केला आहे. त्यानुसार यंदा राष्ट्रीय ई-पुस्तकालय नावाच्या ॲपची निर्मिती करण्यात आली आहे. या माध्यमातून क्युआर कोड स्कॅन करून 23 भाषांमध्ये तब्बल 5 हजार पुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे वाचकांना तब्बल पाच हजार ई-बुक्स मोफत वाचता येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या वर्षाअखेर पर्यंत तब्बल 8 ते 10 हजार पुस्तके या माध्यमातून उपलब्ध करण्यात येणार असल्याचे मलिक यांनी स्पष्ट केले.
पायरेटेड पुस्तकांच्या बाबतीत कारवाई करण्यात येईल. सरकार चुकीच्या गोष्टींना पाठीशी घालणार नाही. सजग नागरिक, पाठ्यपुस्तक निर्माते, लेखक यांनी त्यांना अशा प्रकारची पुस्तके आढळल्यास तक्रार करावी. गेल्यावर्षी तीन स्टॉलधारकांवर कारवाई करण्यात आली. यंदादेखील अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार असल्याचे मलिक यांनी स्पष्ट केले.
‘महोत्सवात माध्यमकर्मी, लेखकांसाठी वेगळे दालन उभारण्यात येणार’
लहान मुलांसाठी एक वेगळी जागा निश्चित करण्यात आली आहे. याठिकाणी 30 हून अधिक प्रकारच्या वेगवेगळ्या कृती करण्यात येणार आहेत. ज्यामध्ये कथालेखनासह अन्य कृतींचा सहभाग असणार आहे. महोत्सवात माध्यमकर्मी तसेच लेखकांसाठी एक वेगळे दालन उभारण्यात येणार असून माध्यमकर्मींना दिवसभराचा आढावा घेता येणार आहे. तर वेगवेगळ्या पुस्तकांच्या लेखकांना एकत्र भेटून चर्चा करता येणार आहे. तसेच महोत्सवात चाणक्य यांचा तीन तासांचा एक कार्यक्रम ठेवण्यात आला असून, ज्यांना राष्ट्रनिर्माण कार्यात आवड आहे त्यांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहणे गरजेचे आहे. त्यासाठी नोंदणी करावी लागणार असल्याचे देखील मलिक यांनी स्पष्ट केले आहे.
राज्यात होणार किमान दहा पुस्तक महोत्सव
राज्यात किमान दहा पुस्तक महोत्सव घेण्यात येणार आहेत. पुस्तक न्यासाची एक फिरती बस पुस्तक वाचनासंदर्भात जनजागृती करत आहेत. या बसच्या जोडीला आणखी दोन बस दिल्या जाणार असून पुण्यासह जिल्ह्यात देखील या बसच्या माध्यमातून पुस्तक वाचनासंदर्भात जनजागृती करण्यात येणार आहे. छायाचित्रकारांसाठी एक एक्झीबिशन ठेवण्यात येणार असून उत्तम छायाचित्रणांसाठी वेगवेगळी पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. तसेच व्यंगचित्रकारांना देखील एक चांगले व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
स्वच्छता आणि पंचप्राणायामाचे यंदा वर्ल्ड रेकॉर्ड
पुस्तक महोत्सवात दरवर्षी वेगवेगळे रेकॉर्ड केले जातात. त्यानुसार यंदादेखील दोन महत्त्वाचे रेकॉर्ड केले जाणार आहेत. यामध्ये पर्यावरणासंदर्भात पाणी, प्लास्टिक यांचा पुनर्वापर तसेच स्वच्छतेसंदर्भात एक रेकॉर्ड करण्यात येणार आहे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंचप्राणायामासंदर्भात साधारण 1 लाख विद्यार्थ्यांना जोडून दुसरा रेकॉर्ड करण्यात येणार आहे.