

अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेमुळे एकट्याने प्रवास करणाऱ्या ज्येष्ठांचे वाढले प्रमाण
स्वारगेट आगारात ज्येष्ठांसोबत घडल्या दोन दुर्घटना
प्रवासादरम्यान वाढले आरोग्य अन् सुरक्षिततेचे प्रश्न
ज्येष्ठांनी एकटे प्रवास न करण्याच्या प्रवासी अभ्यासकांच्या सूचना
स्वारगेट आगारात ज्येष्ठ महिलेचा हृदयविकाराने मृत्यू; 70 वर्षीय नागरिकाचा अपघात
प्रसाद जगताप
पुणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ‘अमृत ज्येष्ठ नागरिक योजने’मुळे 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचा एसटी प्रवास मोफत झाला आणि ज्येष्ठ नागरिकांनी एसटीतून एकट्याने प्रवास करण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली. मात्र हाच प्रवास ज्येष्ठांसाठी धोकादायक ठरत असून, एकट्याने एसटी प्रवास करताना ज्येष्ठांच्या आरोग्याचे आणि त्यांच्या सुरक्षिततेबाबतचे गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत. वाढते वय, शारीरिक मर्यादा आणि आजारपण यामुळे एसटी प्रवासात त्यांची होणारी कसरत आता दुर्दैवी अपघातांना निमंत्रण देत असल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहे.(Latest Pune News)
पुण्यातील स्वारगेट एसटी आगारात नुकत्याच एकट्याने प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत दोन दुर्दैवी घटना घडल्या. स्वारगेट आगारातून प्रवासासाठी आलेल्या 80 वर्षांच्या ज्येष्ठ महिलेला प्रवासादरम्यान हृदयविकाराचा झटका आला अन् त्यातच त्यांचा मृत्यू झाला. एकट्याच असल्याने या ज्येष्ठ महिलेला नक्की काय झाले, हे समजले नाही आणि त्यात त्यांची ओळख पटवणेदेखील मुश्कील झाले होते. दुसऱ्या घटनेत, एसटीची बस मागे (रिव्हर्स) घेताना एक 65 ते 70 वर्षे वय असलेले ज्येष्ठ नागरिक चाकाखाली आले, त्यामुळे त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा पाय कापावा लागला. एसटीने याबाबत खर्च केला असला तरी त्या ज्येष्ठाचा गेलेला पाय परत मिळणे मुश्किल आहे. या दोन्ही घटना गुरुवारी (दि. 6) एकाच दिवशी स्वारगेट आगारात घडल्या. या घटनांच्या पार्श्वभूमीवर दै. ‘पुढारी’ने पाहणी केली असता एसटी बसमधून बहुसंख्य एकट्याने प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण लक्षणीय असल्याचे दिसून आले. त्यामुळे शासनाकडून मोफत प्रवास मिळाला खरा, पण प्रवासादरम्यान या ज्येष्ठांची काळजी कोण घेणार? असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे.
ज्येष्ठ नागरिकांनी एकट्याने प्रवास न करता किमान घरातील एका व्यक्तीला तरी सोबत घेऊन प्रवास करावा. प्रवासात काही अडचण आल्यास किंवा अपघात झाल्यास सोबतची व्यक्ती त्वरित मदतीला येऊ शकते. मात्र, सध्या बहुतांश ज्येष्ठ नागरिक एकटेच फिरत असल्याचे दिसत आहे. त्यांची काळजी घेण्यासाठी कुटुंबातील किमान एका व्यक्तीने तरी त्यांच्यासोबत प्रवास करणे, अत्यंत महत्त्वाचे आहे. शासनानेही याबाबतच्या सूचना तातडीने जाहीर कराव्यात.
संजय शितोळे, प्रवासी अभ्यासक
ज्येष्ठ नागरिकांची फिरण्याची उमेद वाखाणण्याजोगी असली तरी, वयोमानामुळे शरीर साथ देत नसताना आणि एकटे प्रवास करताना वाढणारे अपघात पाहता, त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मोफत प्रवासाची संधी नक्कीच चांगली आहे, पण ती ज्येष्ठांसाठी जीवघेणी ठरू नये, यासाठी आता कुटुंब आणि शासनाने अधिक गंभीर होण्याची गरज आहे. मोफत प्रवासाचा लाभ घेताना सुरक्षित प्रवासाचे नियम पाळणे आणि कुटुंबाचा आधार घेणे आजच्या घडीला अत्यावश्यक बनले आहे.
रवींद्र साळुंखे, ज्येष्ठ प्रवासी