

मंचर : आधुनिक युगातील वेगवान जीवनशैली आणि डिजिटल मनोरंजनाच्या काळात ग््राामीण भागातील पारंपरिक लोककला विस्मृतीच्या गर्तेत जात आहेत. अशाच लोप पावत चाललेल्या कलांपैकी एक म्हणजे नंदीबैलाची कला. मात्र आंबेगाव तालुक्यातील चांडोली गावचे लक्ष्मण आव्हाड हे आजही या परंपरेला जिवंत ठेवत गावोगावी फिरत आहेत.(Latest Pune News)
आव्हाड आपल्या सजवलेल्या नंदीबैलासह दारोदार जाऊन लोकांचे मनोरंजन करतात, शुभेच्छा देतात आणि सणासुदीच्या काळात घराघरात आनंदाचे वातावरण निर्माण करतात. नंदीबैलाचे दर्शन घेतल्यानंतर महिलावर्ग साडी, धान्य किंवा प्रसाद अर्पण करून पूजन करतात. लहान मुलांसाठी ही कला आकर्षणाचे आणि आनंदाचे साधन ठरते.
सध्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही उमेदवार नंदीबैलाला विचारून आपल्यासाठी ’कौल’ मागण्याची जुनी प्रथा पुन्हा दिसून येत आहे. लोकांमध्ये संवाद साधणारे हे लोककलाकार आजच्या काळातही सामाजिक आणि सांस्कृतिक नाते घट्ट ठेवत आहेत.
’तंत्रज्ञानाच्या या युगात लोककला टिकवण्यासाठी समाजाने आणि प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अन्यथा पुढील पिढीला या कलांचा अनुभवच मिळणार नाही,’ अशी भावना आव्हाड व्यक्त करतात.
नागापूरचे सरपंच गणेश यादव म्हणाले, ’आजच्या मोबाईलच्या दुनियेत अशा लोककला पाहायला मिळाल्या की मन प्रसन्न होतं. नंदीबैलवाल्यांनी गावोगावची परंपरा जिवंत ठेवली आहे, हीच आपली खरी सांस्कृतिक ओळख आहे.’