

नारायणगाव : जुन्नर तालुक्यातील विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचा 40 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते व आ. शरद सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच माजी आमदार बाळासाहेब दांगट, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या आशाताई बुचके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे, जुन्नर तसेच आंबेगाव तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, सभासद, ऊस उत्पादक शेतकरी यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि. 3) उत्साहात झाला. उपस्थितांचे कार्यकारी संचालक भास्कर घुले यांनी स्वागत केले. कारखान्याचे आधुनिकीकरण व विस्तारीकरण कामाबाबत माहिती दिली.(Latest Pune News)
प्रास्ताविक करताना कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर म्हणाले, या गळीत हंगामामध्ये आपण 8 हजार मेट्रिक टनापुढे प्रतिदिनी गाळप करणार असल्याने उसाची तोडणी वेळेवर होणार आहे. ऊसवजनाबाबत ऊस उत्पादकांना शंका असल्यास खासगी वजन काट्यावर ऊस वाहनाचे वजन करण्यास कारखान्याची कोणतीही हरकत राहणार नाही. त्यामुळे ऊस उत्पादकांना काळजी करण्याचे कारण नाही. त्यामुळे सभासदांनी कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊस विघ्नहरला गाळपास द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
गळीत हंगाम 2024-25 मध्ये गाळपास आलेल्या उसाला कारखान्याने उच्चांकी असा 3 हजार 255 प्रतिमेट्रिक टन असा ऊसदर दिलेला आहे. कामगारांना 17 टक्के बोनससह इतर देय रक्कम दीपावलीपूर्वी अदा केलेल्या आहेत. कामगारांना 10 टक्क्यांप्रमाणे वेतनवाढ लागू करण्यात येत असल्याचे अध्यक्ष शेरकर यांनी सांगितले.
दरम्यान, गळीत हंगाम 2025-26 करिता कारखाना कार्यक्षेत्रात 22 हजार एकर ऊस उपलब्ध आहे. कारखान्याने 12 लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. एकरी उत्पादनवाढीसाठी कारखान्याचे ऊस विकास विभागामार्फत मार्गदर्शन करण्यात येते. जानेवारी 2026 पासून आपण सर्व सभासदांना फोटोसह स्मार्ट कार्ड देणार आहोत. सर्व सभासदांनी केवायसी करून घ्यावी. त्यामुळे स्मार्ट कार्ड तयार करणे व वितरण करणे सोयीचे होईल, असे या वेळी शेरकर यांनी सांगितले.
कृषिरत्न तसेच कृषी विज्ञान केंद्र नारायणगावचे चेअरमन अनिलतात्या मेहेर यांची भारत सरकारच्या भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या (ऋडडअख) केंद्रीय सल्लागार समितीवर सन 2025 ते 2028 या कालावधीसाठी नियुक्ती झाली आहे. यासह पुणे शहर व पुणे जिल्ह्यातील संस्थाचालक शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे. त्यामुळे त्यांचा या वेळी विशेष सत्कार करण्यात आला.
अध्यक्षीय भाषणात आमदार शरद सोनवणे यांनी करखान्याचा प्रगतीचा आढावा घेऊन कारखान्यास नेहमीच माझे सहकार्य राहणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी तालुक्यातील मानव-बिबट संघर्षाबाबत उपाययोजना करण्याबाबतची सविस्तर माहिती दिली.
प्रारंभी उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते विधिवत गव्हाणीचे पूजन करून गव्हाणीत मोळी टाकण्यात आली. या प्रसंगी आशाताई बुचके, संजय काळे, बाळासाहेब दांगट आदींची भाषणे झाली. उपस्थितांचे आभार कारखान्याचे उपाध्यक्ष अशोक घोलप यांनी मानले.