

खडकवासला: अल्पवयीन मुलांच्या हातात विनापरवाना वाहन देणाऱ्या पालकांसाठी नांदेड सिटी पोलिसांनी कडक इशारा दिला आहे. एका गंभीर गुन्ह्यात वापरलेली दुचाकी अल्पवयीन मुलाला चालविण्यास दिल्याबद्दल नांदेड सिटी पोलिसांनी संबंधित मुलाच्या भावाला सहआरोपी करीत गुन्हा नोंदविला आहे.
नांदेड सिटी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील धायरी परिसरात पूर्ववैमनस्यातून एका भाजी विक्रेत्यावर लोखंडी हत्याराने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्यातील विधिसंघर्षित बालकाने गुन्ह्यासाठी ॲक्टिव्हा (एमएच 31/सीएक्स/8314) ही दुचाकी वापरली होती. ही गाडी चालविण्याचा कोणताही परवाना मुलाकडे नसतानाही, त्याच्या घरच्यांनी ती त्याला उपलब्ध करून दिली होती, असे तपासादरम्यान निष्पन्न झाले.
गुन्ह्यात वापरलेली दुचाकी अल्पवयीन मुलाला दिल्याबद्दल पोलिसांनी गांभीर्य लक्षात घेऊन मुलाचा भाऊ सुधीर हनुमंत गायकवाड (रा. धायरी, पुणे) याला या गुन्ह्यात सहआरोपी केले आहे. मुलांच्या गुन्हेगारी कृत्यांना किंवा बेजबाबदारपणे वाहन चालविण्यास प्रोत्साहन देणाऱ्या पालकांविरुद्ध यापुढेही अशीच कठोर कारवाई केली जाईल, असे संकेत पोलिसांनी दिले आहेत.
ही कारवाई पुणे शहरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त प्रवीणकुमार पाटील, पोलिस उप आयुक्त (परिमंडल 3) संभाजी कदम आणि सहाय्यक पोलिस आयुक्त (सिंहगड रोड विभाग) अजय परमार यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. नांदेड सिटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल भोस, पोलिस निरीक्षक (गुन्हे) प्रसाद राऊत आणि पीएसआय दत्तात्रय सावंत यांच्या पथकाने ही कारवाई केली.
पालकांनी आपल्या अल्पवयीन पाल्यांच्या हातात वाहन देऊ नये; अन्यथा पाल्याने केलेल्या गुन्ह्यात किंवा अपघातात पालकांनाही जबाबदार धरून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
अतुल भोस, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, नांदेड सिटी पोलिस स्टेशन