

पुणे: ‘माझे वडील प्रशांत थोपटे यांनी केलेल्या समाजकार्यामुळे प्रभागाची ओळख झाली. तसेच, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून घरोघरी जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न केला. याचा फायदा मला निवडणुकीत झाला.त्यामुळेच मी निवडून आले!’ असे मत पुणे महापालिका निवडणुकीत निवडूण आलेली शहरातील सर्वांत तरुण उमेदवार सई थोपटे हिने ‘पुढारी’शी दिलखुलास गप्पा मारताना व्यक्त केले.
सई प्रशांत थोपटे हीचे वय अवघे 22 वर्षे, डोळ्यांत लोकांची कामे करण्यासाठीचा आत्मविश्वास अन् उत्साह दिसत होता. शहरातील प्रभाग क्रमांक 36 ‘क’ गटातून सईने राष्ट्रवादीच्या उमेदवार नीलम गांधी यांचा पराभव केला. अत्यंत आत्मविश्वासाने बोलताना ती म्हणाली, मी तरुण आहे, महापालिकेत तरुणांचे प्रतिनिधित्व करणार आहे. प्रभागातील बेरोजगारी व गुन्हेगारी हे प्रश्न प्रामुख्याने सोडवणार आहे. तरुणांना रोजगार देण्यासाठी रोडमॅप तयार करणार आहे.
संघाचे संस्कार बालपणीच मिळाले...
ती म्हणाली, माझे वडील त्यांच्या दोन भावंडांसोबत जय मल्हार वसाहतीत एका पत्र्याच्या खोलीत राहत होते. या खोलीला दरवाजा देखील नव्हता. आमच्या आजीने तिन्ही मुलांना कष्टाने वाढवले व शिकवले. वडील पुढे एका शाळेत कारकून म्हणून कामाला लागले. त्यांनी सुरुवातीपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम केले. त्यांनी विविध जबाबदाऱ्या देखील सांभाळल्या. त्यांच्या विचारांचा प्रभाव माझ्यावर कायम आहे.
‘अभाविप’ च्या कामाचा अनुभव...
मी वडीलांसोबत समाजकार्य करीत होते. कोरोनाकाळात नागरिकांच्या सेवेचे काम करीत असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या एका कार्यकर्त्याशी संपर्क आला. तेव्हा वडिलांनी तू देखील अभाविपचे काम कर, असे सांगितले. मी 2022 पासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विविध पदांवर काम केले. विविध आंदोलनांतून तरुणांचे व सामाजिक प्रश्न हाताळले.
कौशल्य विकास अन् प्रभागाची सुरक्षा
प्रभागात बेरोजगारी, गुन्हेगारी, अस्वच्छता यांसारखे अनेक प्रश्न आहेत. बेरोजगारी कमी करण्यासाठी तरुणांंना कौशल्य विकास शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यांच्या आवडी-निवडी ओळखून त्यांना रोजगार किंवा व्यवसाय उभारणीस मदत होईल अशी यंत्रणा निर्माण करण्यावर भर देणार आहे. गुन्हेगारी कमी करण्यासाठी प्रभागात सीसीटीव्ही जाळे निर्माण करण्यासोबतच पोलिसांची गस्त वाढविणार. महिलांच्या रोजगारासाठी देखील प्राधान्याने काम करणार आल्याचे सई यांनी सांगितले.
अचानक निवडणुकीला उभे राहावे लागले
महापालिका निवडणुकीत खरे तर वडिलांना तिकीट मिळण्याची आशा होती. मात्र, महिला आरक्षण पडल्याने वडिलांनी मला तयारी करायला सांगितले. मी देखील ही बाब सकारात्मक घेऊन निवडणूक रिंगणात उतरले. वडिलांच्या तब्बल 30 वर्षांचे सामाजिक कार्य मी जवळून पाहिले होते. त्यांच्या कामाचा फायदा मला निवडणुकीत झाला.