Hidden nakabandi extortion in Pune
पुणे: मित्रासोबत कोरेगाव पार्क परिसरात आलेल्या एका व्यक्तीकडून कारवाईच्या धाकाने पोलिसांनी तीनवेळा पैसे उकळले. पुढे काही अंतरावर त्याला परत नाकाबंदी दिसली. त्याला वाटले आता पोलिस आपल्याला येथे अडवून देखील पैसे घेणार, त्यामुळे त्याने गाडी वेगात बॅरिकेडला धडकवून पळवली.
त्यामध्ये एक महिला पोलिस हवालदार जखमी झाल्या. या व्यक्तीला पोलिसांनी पकडले. त्याने दिलेल्या जबाबात एका सहायक पोलिस निरीक्षकासह चौघा पोलिसांचा नाकाबंदीतील प्रताप उघड झाला. त्यामुळे नाकाबंदी हे गुन्हे प्रतिबंधासाठी नसून, ते खंडणी उकळण्याचे नाके झाले आहेत की काय? असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. (Latest Pune News)
दरम्यान, पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी ‘या खंडणीखोर पोलिसांवर देय वार्षिक वेतनवाढ पुढील वेतनवाढीवर परिणामकारक राहणार नाही, अशा रीतीने एक वर्ष कालावधीसाठी रोखण्यात येत आहे,’ अशी शिक्षा सुनावली आहे. शासकीय कर्तव्य बजावत असताना पोलिस दलाची प्रतिमा मलिन करून शिस्तीचे उल्लंघन करणारे अशोभनीय असे बेशिस्त, बेपर्वा, बेजबाबदारपणा व निष्काळजीपणाचे गैरवर्तन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
सहायक पोलिस निरीक्षक स्वप्निल उत्तम नेवसे, पोलिस हवालदार सुहास भीमराव धाडगुडे, प्रकाश दादासो कट्टे, पोलिस अंमलदार सचिन कल्याण वाघमोडे यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. त्या वेळी हे चौघे कोरेगाव पार्क वाहतूक विभागात नेमणुकीस होते. हा प्रकार नायडू हॉस्पिटल लेनमध्ये एआयएसएसएमएस कॉलेजसमोर वेलेस्ली रोड येथे 9 डिसेंबर 2024 रोजी मध्यरात्री एक वाजून 20 मिनिटांनी घडला होता.
नाकाबंदीच्या वेळी ’ड्रंक अँड ड्राइव्ह’ची कारवाई चालू असताना जहांगीर चौकाकडून आलेल्या एका कारचालकाने बॅरिकेडला धडक देऊन तेथे कर्तव्यास असलेल्या महिला पोलिस हवालदार दीपमाला नायर यांना सुमारे 50 ते 60 मीटर अंतरापर्यंत नेले होते. पोलिसांनी गुन्हा दाखल करून अर्णव सिंघल याला ताब्यात घेतले होते.
त्याच्याकडे चौकशी करून त्याचा जबाब पोलिसांनी नोंदविला. त्यामध्ये सिंघल याने सांगितले की, 8 डिसेंबर 2024 रोजी कोरेगाव पार्कमधील नाकाबंदी ठिकाणी या पोलिसांनी त्यांच्याकडून 5 हजार रुपये घेतले.
तसेच त्याच दिवशी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास कोरेगाव पार्क लेन नं. 7 येथे पब्लिक पब येथे जात असताना पबपासून सुमारे 700 ते 800 मीटर अंतरावर थांबले असताना तेथे एक टोव्हिंग व्हॅनवरील वाहतूक पोलिसांनी नो-पार्किंगमध्ये गाडी असल्याने 10 हजार रुपये भरण्यास सांगून 2 हजार 500 रुपये घेतले. तसेच 9 डिसेंबर 2024 रोजी मध्यरात्री 1 वाजता घरी जाण्यासाठी निघाले असताना नाकाबंदी ठिकाणी या पोलिसांनी ब्रेथ अॅनालायाझर चेकिंग केली असता त्यामध्ये अल्कोहोल नसल्याचे दिसून आले. मात्र, त्यानंतर देखील ’तुम सब दारू पिये हो’ असे बोलून त्यांच्याकडून 5 हजार रुपये घेतले.
त्या पोलिसांचे वर्तन आक्षेपार्ह अन् संशयास्पद: आयुक्त
नाकाबंदीदरम्यान कारवाईच्या धाकाने खंडणी उकळता यावी म्हणून हे पोलिस चांगलीच मेहनत घेत असल्याचे दिसून आले आहे. पैसे घेताना आपण कॅमेर्यात येऊ नये म्हणून पुरेपूर काळजी घेत होते. तसेच उद्या एखाद्याने तक्रार केली तर आपला चेहरा ओळखता येऊ नये म्हणून तोंडाला मास्क देखील लावत असे.
त्यांचे हे वर्तन आक्षेपार्ह आणि संशयास्पद असल्याचे पोलिस आयुक्तांच्या आदेशात म्हटले आहे. दरम्यान, अनेकदा वाहतूक पोलिस कारवाई करताना आपली नेमप्लेट एकतर खिशात मोबाईल किंवा चलान मशिन ठेवून झाकून ठेवतात, नाहीतर ती खाली पाडून ठेवतात.