

MVA accuses BJP of controlling ward restructuring
पुणे: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शहरातील प्रभागरचना करताना निवडणूक आयोगाने नदी, नाले, मुख्य रस्ते, नैसर्गिक अडथळ्यांनुसार विभागणी करावी, असे स्पष्ट निर्देश दिले असताना महापालिका प्रशासनावर दबाव टाकत भाजप पदाधिकार्यांच्या सूचनेनुसार प्रभागांचे तुकडे करून पक्षाचा फायदा होईल, या पद्धतीने रचना करण्यात आली.
ही प्रभागरचना करताना भाजपकडून प्रशासनावर दबाव टाकण्यात आला असून, नियमबाह्य हस्तक्षेप करण्यात आल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर, नगरविकास विभाग व निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्याबरोबरच न्यायालयातही धाव घेणार असल्याचा इशारा महाविकास आघाडीने शनिवारी दिला. (Latest Pune News)
महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, काँग्रेस, शिवसेनेच्या (ठाकरे गट) शहराध्यक्षांनी शनिवारी (दि. 2) पत्रकार परिषद घेत प्रभाग रचना करताना भाजपच्या पदाधिकार्यांनी सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप केला. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, शिवसेनेचे संजय मोरे, गजानन थरकुडे यांनी ही पत्रकार परिषद घेतली.
पुणे महापालिकेच्या अधिकार्यांनी शहराची प्रभाग रचना चुकीच्या पद्धतीने बनवली आहे. सर्किट हाऊस येथे अधिकार्यांनी केवळ सत्ताधारी पक्षाच्या माजी नगरसेवकांना बोलावून त्यांच्या सोयीचे प्रभाग आणि वॉडची रचना केली आहे. महापालिका अधिकार्यांनी सत्ताधारी पक्षासमोर सपशेल लोटांगण घातले आहे.
महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी आम्हाला वेळ दिली नाही. आयुक्त पक्षपातीपणे काम करत आहेत. सेवेतील अधिकारी असो की यापुढे निवृत्त होणारे आम्ही चुकीचे काम करणार्या अधिकार्यांना सोडणार नाही, असा थेट इशाराच देखील त्यांनी दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत जगताप म्हणाले की, पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना आम्ही वारंवार चर्चेसाठी वेळ देण्याची मागणी केली. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या वतीने महापालिका प्रशासनाला वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला.
मात्र, सत्ताधार्यांच्या दबावामुळे प्रशासनाकडून आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही. आम्हाला चर्चेला त्यांनी बोलावलेच नाही. आयुक्तांनी केवळ सत्ताधारी पक्षाच्या माजी नगरसेवकांना सर्किट हाऊस येथे बोलावले. तसेच त्यांनी हवी तशी प्रभाग रचना तयार करुन ती 4 ऑगस्टला राज्य शासनाला सादर करण्यात येणार आहे.
काँग्रेसचे अरविंद शिंदे म्हणाले की, सत्ताधारी पक्षांना हवी तशी प्रभाग, वॉर्ड रचना तयार करुन देणार्या महापालिका अधिकार्यांना उत्तर द्यावे लागणार आहे. नियमाला बगल देऊन सत्ताधारी पक्षांना फायदा होईल अशी प्रभाग रचना त्यांनी तयार केली आहे. अशा पद्धतीने चुकीचे काम करणार्यांविरोधात आम्ही कायदेशीर पद्धतीने लढणार आहोत.
शिवसेनेचे संजय मोरे आणि गजानन थरकुडे म्हणाले की, प्रभाग रचणेबाबत अधिकारी पक्षपातीपणे काम करत आहेत. प्रशासनाने तटस्थपणे काम करणे आपक्षित असतांना सत्ताधार्यांच्या दबावाला बळी पडून काम होत असेल तर हे चुकीचे आहे.
निवडणूक आली की दंगल घडविणे, हा भाजपचा फंडा
भारतीय जनता पक्षाकडून जाती, धर्मामध्ये भांडणे लावण्याचे काम सुरु आहे. निवडणुकीपूर्वी दंगल घडू आणण्याचा भाजपचा फंडा आहे. दौंड तालुक्यातील यवत येथे घडलेला प्रकार याचेच द्योतक आहे. यवतच्या घटनेला जबाबदार असणार्या व प्रक्षोभक भाषण करणार्या भाजपच्या सर्व नेत्यांवर गुन्ह दाखल करण्यात यावे अशी मागणी यावेळी महावीकास आघाडीच्या नेत्यांनी केली.