

कोरेगाव मूळ: कोरेगाव मूळ (ता. हवेली) येथील मोरे वस्ती परिसरात गायरान जागेच्या वापराबाबत स्थानिक दोन गटात वाद सुरू होता. तो वाद रविवारी (दि. 27 जुलै) अचानक विकोपाला गेला. या वादातून एका 23 वर्षीय महिलेला जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात तक्रारी दाखल केल्याने उरुळी कांचन पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अधिक माहितीनुसार, फिर्यादी महिला आपल्या आई व लहान मुलांसह मोरे वस्ती येथे राहात असून, मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. त्यांच्या घराला लागून असलेल्या न्हाणीच्या शेजारी गायरान जागा आहे. रविवारी दुपारी चारच्या सुमारास या मोकळ्या जागेत स्वप्निल पांडुरंग मोरे या युवकाने खड्डा खोदण्यास सुरुवात केली. (Latest Pune News)
महिलेनुसार, खड्डा न्हाणीला लागूनच असल्याने त्यांनी मोरे यांना विरोध केला. आणि “तुम्ही इथे खड्डा का खोदता? आम्हाला अंघोळ कशी करता येईल”, अशी विचारणा केली. यावर स्वप्निल मोरे याने “ही जागा तुमच्या बापाची नाही... तुम्हा लोकांना येथे राहूच द्यायचं नाही”, असे म्हणत जातिवाचक शब्द उच्चारले. तसेच महिलेला ढकलून दिले. त्या वेळी मोरेच्या हातातील लोखंडी पहार महिलेला लागली. त्यात ती जखमी झाली.
दरम्यान, वाद सुरू असताना घटनास्थळी फिर्यादी महिलेच्या मदतीसाठी तिचा भाऊ समाधान परशुराम अवचट पोहोचला. त्यालाही शिवीगाळ करत विजय मारुती शिंदे व केतन बाळासो सोनवणे यांनी मारहाण केली. त्याचवेळी स्वप्निल मोरे याने रागाच्या भरात एक वीट उचलून फिर्यादी महिलेला फेकून मारली. ती वीट तिच्या शरीराला लागल्याचेही तक्रारीत नमूद आहे. स्वप्निल मोरे याने दिलेल्या फिर्यादीनुसार, मोरे याला महिला व तिच्या भावाने मारहाणीचा आरोप करण्यात आला आहे.
पोलिसांनी या घटनेत दोन्ही बाजूंच्या तक्रारींचा विचार करून, एकमेकांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. त्यात स्वप्निल पांडुरंग मोरे, विजय मारुती शिंदे, केतन बाळासो सोनवणे यांच्यासह फिर्यादी महिला व समाधान परशुराम अवचट यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या प्रकरणाचा तपास उरुळी कांचन पोलिस करत आहेत. प्रत्यक्षदर्शी, घटनास्थळीचे निरीक्षण, वैद्यकीय अहवाल आणि जातिवाचक टिप्पणीचे स्वरूप यावरून पुढील कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.