

Farmers waiting for land acquisition compensation
मंचर: खेड-सिन्नर चारपदरी सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. रस्ता पूर्ण होऊन वाहतुकीसाठी 3 वर्षांपूर्वी सुरू झाला; मात्र अद्यापही रस्त्यासाठी भूसंपादन झालेल्या जमिनीचा शेतकर्यांना पूर्ण मोबदला मिळाला नाही.
याबाबत शेतकर्यांनी राष्ट्रीय प्राधिकरण विभागाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली आहे. जमिनी देऊन पश्चात्ताप करण्याची वेळ आली असल्याची भावना शेतकरी बोलून दाखवत आहेत. (Latest Pune News)
खेड-सिन्नर रस्त्यावर वारंवार होणारी वाहतूक कोंडी, तसेच वाहनांची वाढलेली संख्या लक्षात घेता या रस्त्याचे काम राष्ट्रीय प्राधिकरण विभागाच्या वतीने करण्यात आले असून, पूर्वी दोनपदरी असलेला रस्ता आता चारपदरी झाला असून काही ठिकाणी डांबरीकरण आणि काँक्रिटीकरण झाला आहे. र
स्त्यावर वाहतुकीची समस्या असलेल्या शेवाळवाडी, एकलहरे, नारायणगाव, अवसरी, पेठ घाट, आळेफाटा आदींसह ज्या ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या होती, त्या ठिकाणी बाह्यवळण होऊन वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्याचा प्रयत्न महामार्ग विभागाने केला आहे; मात्र या महामार्गाचे काम करत असताना ज्या शेतकर्यांच्या जमिनी गेल्या आहेत, त्यांना अद्यापही जमिनीचा पूर्ण मोबदला मिळाला नाही.
आजही अनेक शेतकर्यांना पुणे-वारजे येथील राष्ट्रीय प्राधिकरण कार्यालयात मोबदला घेण्यासाठी हेलपाटे मारावे लागत असून, संबंधित अधिकारी वेळेत मिळत नाहीत, अनेकदा अधिकारी कार्यालयात मिळत नसल्याने शेतकर्यांना पुन्हा माघारी यावे लागत आहे. अनेकदा अधिकारी मिळूनही उडवाउडवीची उत्तरे देत आहेत, तसेच अनेक नियम, अटी सांगून कागदपत्राची वारंवार पूर्तता करण्यास सांगत आहेत. त्यामुळे शेतकर्यांना मनस्ताप वाढला आहे. जमिनी देऊन पश्चाताप करण्याची वेळ आली असल्याची भावना शेतकरी बोलून दाखवत आहेत.
शेतकर्यांना सहकार्य करायचे सोडून राष्ट्रीय प्राधिकरण विभाग शेतकर्यांना मनस्ताप देण्याचे काम करत आहे. अनेक शेतकर्यांना काही रक्कम मिळाली आहे, तर काही रक्कम मिळवायची आहे. काही शेतकर्यांना ठरलेल्या दरापैकी कमी दर मिळाला आहे.
याबाबत गेले तीन-चार वर्ष पाठपुरावा करूनदेखील पैसे मिळत नसल्याने जमिनी संपादन झालेले शेतकरी आता मेटाकुटीला आले आहेत. रस्त्यासाठी जमिनी देऊनही शासन वेळेत मोबदला देत नसेल तर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बाधित शेतकर्यांनी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे, अशी माहिती मंचर-निघोटवाडी येथील शेतकरी प्रमोद बाणखेले यांनी दिली.
घेतलेल्या जमिनीवरच करणार उपोषण
रस्ता करण्याअगोदर संबंधित विभागाचे अधिकारी शेतकर्यांशी गोड बोलून जमीन हस्तांतरित करतात; मात्र मोबदला द्यायच्या वेळी उडवाउडवीची उत्तरे देतात. त्यामुळे यापुढील काळात रस्त्यांसाठी जमिनी द्यायच्या की नाही, असा प्रश्नदेखील अनेक शेतकर्यांना पडला आहे. राष्ट्रीय प्राधिकरण महामार्ग विभागाच्या अधिकार्यांनी बाधित शेतकर्यांना ताबडतोब पैसे द्यावे; अन्यथा मंगळवारी (दि. 5) ज्या शेतकर्यांच्या जमिनी गेल्या आहेत, ते शेतकरी त्या जमिनीवरच उपोषण करण्याचा इशारा शेतकर्यांनी दिला आहे.
मंचर-निघोटवाडी रस्त्याच्या भूसंपादनात माझी जमीन जाऊन 7 वर्षे पूर्ण होऊनही आजपर्यंत मला 2 गुंठ्यांचा मोबदला मिळालेला नाही. वारंवार पाठपुरावा व अर्ज करूनही राष्ट्रीय प्राधिकरण महामार्ग विभागाकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने मंगळवारी माझ्या गेलेल्या जमिनीच्या जागेतून चालू असलेल्या रस्त्यावर मी उपोषण करणार आहे.
- प्रमोद हरिभाऊ बाणखेले, बाधित शेतकरी, निघोटवाडी- मंचर.