भोर : पुढारी वृत्तसेवा : वयोवृद्ध महिलेच्या अंत्यविधीचा कार्यक्रम झाल्यावर अग्नीतील अर्धवट जळालेला मृतदेह सळईच्या साहाय्याने बाहेर काढून मृतदेहाची विटंबना करण्यात आली. ही घटना बालवडी (ता. भोर) येथील स्मशानभूमीत रविवारी (दि. 24) सायंकाळी घडली. याबाबत प्रकाश सदूभाऊ बढे (रा. नेरे, ता. भोर) याला गावातील तरुणांनी चोप देऊन भोर पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला. याबाबत मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी अक्षय विजय किंद्रे (वय 30, रा. बालवडी, ता. भोर) यांच्या आजी ताराबाई आनंदा किंद्रे यांचे निधन झाले.
रविवारी सायंकाळी 6 वाजता गावच्या स्मशानभूमीत बालवडी ग्रामस्थांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार करून ते घरी परतले. स्मशानभूमीजवळ राहणारे नेरे गावातील रहिवासी प्रकाश बढे याने मृतदेह जळत असलेल्या प्रेताजवळ जाऊन लोखंडी सळईच्या साह्याने अर्धवट जळलेला मृतदेह बाहेर काढून ओढ्याजवळ फेकून दिला व मृतदेहाची विटंबना केली. हे कृत्य रस्त्यावरून जात असलेल्या नागरिकांनी पाहिले. संबंधित नातेवाइकांना कळवून माहिती देण्यात आली. दरम्यान घटनेच्या ठिकाणी गावातील तरुण, ग्रामस्थ यांनी जमून आरोपी प्रकाश बढे याला चांगला चोप दिला. यामध्ये बढे गंभीर जखमी झाले असून, भोर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. त्यावर मानवी शवाची अप्रतिष्ठा करून व्यत्यय आणून अपमान करून विटंबना केल्याचा गुन्हा दाखल केला.
दरम्यान, अर्धवट जळालेल्या मृतदेहाची विटंबना झाल्यामुळे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी ग्रामस्थांनी जमाव करीत विरोध केला. घटनास्थळी पोलिस निरीक्षक अण्णा पवार, सहायक पोलिस निरीक्षक दीप्ती करपे, अनिल चव्हाण, पोलिस हवालदार विकास लगस, उद्धव गायकवाड, केतन खांडे, हेमंत भिलारे यांनी जाऊन ग्रामस्थांची समजूत काढून अर्धवट जळालेल्या मृतदेहाला पुन्हा अग्नी दिला.
बालवडी स्मशानभूमीजवळ प्रकाश बढे यांची शेती, हॉटेल आणि शेड असल्यामुळे स्मशानभूमीचा त्रास होईल, या हेतूने स्मशानभूमीत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास विरोध असल्यामुळे बढे यांनी हे कृत्य केले आहे. या घटनेनंतर जमावाकडून बढे यांच्या शेडची मोडतोड करून हॉटेल जाळण्यात आले. भोर नगर परिषदेच्या अग्निशामक बंबाच्या साह्याने आग आटोक्यात आणण्यात आली.
हेही वाचा