शिरूर शिक्षण मंडळाच्या 4 पदाधिकार्‍यांवर अ‍ॅट्रॉसिटी.. | पुढारी

शिरूर शिक्षण मंडळाच्या 4 पदाधिकार्‍यांवर अ‍ॅट्रॉसिटी..

शिरूर : पुढारी वृत्तसेवा : शिरूर शहरातील प्रसिध्द असलेल्या शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या चार पदाधिकार्‍यांसह दोन कर्मचार्‍यांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. यात माजी अध्यक्ष अनिल बोरा, सचिव नंदकुमार निकम यांचा समावेश आहे. याबाबत काशिनाथ नारायण वेताळ (रा. जोशीवाडी, शिरूर) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वेताळ हे सन 2022 पासून मंगलमूर्ती विद्याधाममध्ये मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. तत्पूर्वी त्यांना सेवा ज्येष्ठतेनुसार पात्र असतानाही संस्थेने मुख्याध्यापकपद देण्यास नकार दिला होता. त्याविरोधात त्यांनी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) पुणे यांच्याकडे तक्रार केली होती.

त्याविरोधात संस्थेने उच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल केले होते. वेताळ यांनी शाळा न्यायाधिकरण पुणे येथे देखील पदोन्नतीबाबत संचालक मंडळ व कनिष्ठ शिक्षकांविरुद्ध याचिका दाखल केली होती. या याचिकेचा निकाल त्यांच्या बाजूने लागल्याने शिक्षणाधिकार्‍यांनी 1 जुलै 2014 रोजी त्यांना मुख्याध्यापकपदी नियुक्तीचे आदेश दिले होते. दरम्यान, संचालक मंडळाच्या विरोधात जाऊन उच्च न्यायालयाच्या आदेशाने मुख्याध्यापकपद स्वीकारल्याने संस्थेचे पदाधिकारी व काही शिक्षकांनी दुर्लक्ष करीत अपमान केल्याचे, विद्यालयीन कामकाजात असहकार्य केल्याचे, जातीय विद्वेषातून मानसिक त्रास दिल्याचे, दबाव, दमदाटी केल्याचे वेताळ यांच्या फिर्यादीत म्हटले आहे.

त्याआधारे पोलिसांनी शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष अनिल बोरा, सचिव नंदकुमार निकम, शाळा समिती अध्यक्ष प्रकाश बोरा, सदस्य कुमारपाल बोरा यांच्यासह मंगलमूर्ती विद्याधामचे पर्यवेक्षक सुभाष पाचकर व वरिष्ठ लिपिक सूरज जाधव यांच्याविरोधात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला. शिरूर शहरातील नामांकित असलेल्या या शिक्षण संस्थेच्या पदाधिकार्‍यांविरोधात गुन्हा दाखल झाल्याने शिरूर शहरात खळबळ उडाली आहे. सचिवाबद्दल नाराजी असल्याची शिरूर शहरात दबक्या आवाजात चर्चा आहे.
दरम्यान शिरूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

हेही वाचा

Back to top button