पिंपरी : दारू पिताना झालेल्या किरकोळ वादातून दोघांनी मिळून मित्राचा खून केला. त्यानंतर मित्राचा मृतदेह गोधडीत गुंडाळून नाल्यात फेकून दिला. ही घटना थेरगाव येथे 5 ऑक्टोबर रोजी घडली. सूरज ऊर्फ जंजीर कांबळे (30, रा. जगतापनगर, थेरगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. पंकज रतन पाचपिंडे (वय 28) आणि अमरदिप ऊर्फ लखन दशरथ जोगदंड (33, दोघेही रा. थेरगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींची 5 ऑक्टोबर रोजी दारू पिताना मयत सूरज कांबळे यांच्याशी भांडण झाले होते. त्यामुळे संतापलेल्या आरोपींनी संगनमत करून चाकूने सूरज याच्या गळ्यावर वार करुन त्याचा मृतदेह गोधडीत गुंडाळून तीनचाकी टेम्पोतून गायकवाडनगर येथील नाल्यात टाकून दिला होता.
दरम्यान, दोन दिवस काहीच घडले नाही, असे आरोपी परिसरात वावरत होते. पती घरी न आल्याने सूरजच्या पत्नीने बेपत्ता असल्याची फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. त्यावेळी पकडले जाऊ, या भितीने आरोपी बीड जिल्ह्यात पळून गेल्याचे पोलिसांना समजले. आरोपींनी घाबरून स्वतःचे मोबाइलही बंद करून ठेवले होते. मात्र, पोलिसांनी माग काढून त्यांना बीडमधून ताब्यात घेतले. आरोपींकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी खुनाची कबुली देत मृतदेह फेकून दिलेला नाला पोलिसांना दाखविला.
हेही वाचा