…तर शरद मोहोळ वाचला असता!

…तर शरद मोहोळ वाचला असता!

पुणे/कोथरूड : पुढारी वृत्तसेवा :  गुंड शरद मोहोळ याचा गेम करण्यासाठी मुन्ना पोळेकरने एका तरुणाला कटात सहभागी होण्यासाठी जबरदस्ती केली होती. मात्र, तरुणाने याला नकार दिल्यानंतर मुन्ना पोळेकर आणि त्याच्या साथीदारांनी त्याच्या पायावर गोळी झाडल्याचा धक्कादायक प्रकार तपासात समोर आला आहे. हा प्रकार जर तेव्हाच समोर आला असता तर शरद मोहोळ वाचला असता असे याबाबत आता बोलले जात आहे. रात्री उशिरा याप्रकरणी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू केले होते. दरम्यान, हा गुन्हा लवकरच ग्रामीण पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मुन्ना पोळेकर आणि त्याच्या साथीदारांनी मागील शुक्रवारी (दि.5) शरद मोहोळवर पिस्तुलातून गोळ्या झाडून खून केला. कोल्हापूरच्या दिशेने पळून जात असताना वकिलासह आठ जणांच्या टोळीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या. कोथरूड पोलिसांच्या सुरुवातीच्या तपासानंतर हा गुन्हा गुन्हे शाखेकडे तपासासाठी वर्ग करण्यात आला. तपासामध्ये मुन्ना पोळेकरने अजय सुतार नावाच्या एका तरुणावर शरद मोहोळचा गेम करण्यासाठी कटात सहभागी होण्याची ऑफर दिली होती. परंतु, हा सर्व प्रकार अजय सुतारला न पटल्याने त्याने पोळेकरच्या कटात सहभागी होण्यास नकार दिला होता. याच्याच रागातून पोळेकर आणि त्याच्या साथीदारांनी अजय याच्या पायावर भूगावमध्ये गोळ्या झाडल्या होत्या. त्यात तो गंभीर जखमी झाला होता. गंभीर जखमी झाल्यानंतर त्याच्यावर एका खासगी डॉक्टरने उपचार केले होते. तसेच, त्याला नंतर सोडून दिले होते. मात्र, काही दिवसांपूर्वीचा हा सगळा प्रकार समोर आला नाही. याचीच संधी साधत मुन्ना पोळेकर आणि त्याच्या साथीदारांनी शरद मोहोळ याच्यावर हल्ला करत आपला डाव साधला.

त्या दिवशी असे घडले…
अजय सुतार हा यापूर्वी अटक केलेल्या नामदेव कानगुडे याचा मित्र आहे. दरम्यान, अजय याला नामदेवने बोलवून घेतले. दोघे चांदणी चौकात आले. तेथे पोळेकर आला व तिघे गाडीतून नामदेवच्या घरी गेले. तेथे पार्किंगमध्ये बसले व त्याला सांगितले की, शरद मोहोळचा खून करायचा आहे. तू आमच्यासोबत सामील हो आणि मदत कर, असे सांगितले. पण, त्याने नकार दिला. तेव्हा त्यांच्यात वाद झाले आणि वादानंतर तो निघून जात असताना मुन्ना पोळेकरने अजय याच्या पायावर दोन गोळ्या झाडल्या. यात एक गोळी आरपार गेली व एक गोळी चाटून गेल्याचे समोर आले अशी माहिती समोर आली आहे. त्यानुसार पोलिसांनी आता खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद केला आहे.

पोलिसांना माहिती दिलीच नाही
अजय नावाच्या तरुणाला कटात सहभागी होण्यासाठी मुन्ना पोळेकरने विचारले होते. मात्र, कटात सहभागी न झाल्याने नंतर त्याने त्याच्या पायावर गोळ्या झाडल्या. याप्रकरणात जखमी झालेल्या तरुणाने याबाबत पोलिसांना माहिती दिली नाही. डॉक्टरांनीही पोलिसांना कळवले नाही. हा कटाचा भाग जर पोलिसांना समजला असता तर आज शरद मोहोळ वाचला असता.

पैसे पुरविणार्‍यांसह तीन ताब्यात
मुन्ना पोळेकर आणि त्याच्या साथीदारांना एकाने पैसे पुरविल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी त्याच्या देखील मुसक्या आवळल्या आहेत. त्याबरोबरच अन्य दोघांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडे एकंदरीत प्रकरणात सखोल माहिती घेतली जाणार आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news