

पुणे : मराठवाड्यात आलेल्या पूरस्थितीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांचे गणित बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका लांबणीवर पडून त्याआधी महापालिकांच्या निवडणुका घेण्यासंबधीची चाचपणी सुरू आहे. महापालिकांच्या निवडणूक प्रकियेबाबत तयारी करा, अशा पद्धतीच्या सूचना प्रशासकीय सूत्रांकडून देण्यात आल्या असून, त्यानुसार येत्या दोन दिवसांत अंतिम प्रभागरचना जाहीर केली जाणार आहे.
राज्यातील महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपरिषदा यांच्या निवडणुका गेल्या काही वर्षांपासून रखडल्या आहेत. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आता 31 जानेवारी 2026 पर्यंत या सर्व निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्यानुसार निवडणूक आयोगाने निवडणुकीसाठी आवश्यक असलेल्या मतदान यंत्राच्या उपलब्धतेनुसार पहिल्या टप्प्यात दिवाळीनंतर म्हणजेच नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या यांच्या निवडणुका घेऊन जानेवारी महिन्यात सर्व महापालिकांच्या निवडणूका घेण्याचे नियोजन केलेले आहे.
गेल्या दोन आठवड्यांपासून मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती गंभीर झाली आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, सर्व प्रशासकीय यंत्रणा पंचनामे आणि मदतकार्यात गुंतली आहे. त्यामुळे निवडणुकीचे काम मागे पडले आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच निवडणुका पुढे ढकलाव्यात किंवा महापालिका निवडणुका आधी घ्याव्यात, असे दोन पर्याय समोर आले आहेत. मराठवाड्यात अद्याप पंचनामे पूर्ण झालेले नाहीत, त्यातच सणांचे दिवस आले आहेत.
शासनाकडून पूरस्थितीसाठी स्वतंत्र निधी अद्याप जाहीर झालेला नाही. राज्याची आर्थिक स्थिती लक्षात घेता तत्काळ मदत देणे शक्य नसल्याने शासनाने केंद्राकडे प्रस्ताव पाठविला आहे. केंद्राची वाट न पाहता मदत देणार असल्याचे सांगण्यात येत असले, तरी प्रत्यक्षात झालेले नुकसान मोठे असून, शेतकरी आक्रमक झाले आहेत. अशा परिस्थितीत जिल्हा परिषदा-पंचायत समित्यांच्या निवडणुका झाल्यास महायुतीला फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषद, पंचायत समित्या यांच्या निवडणूका लांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे जानेवारी महिन्यात प्रस्तावित असलेल्या महापालिकांच्या निवडणूका आता नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात घेण्याची शक्यता आहे.
याबाबत महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिका निवडणुकींची संपूर्ण तयारी वरिष्ठ पातळीवर करण्याची सूचना प्रशासनाला करण्यात आली आहे. मतदारयाद्या जाहीर करण्यासाठीही महापालिकांना निर्देश दिले असून, पुढील दोन दिवसांत वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे.