नव्या प्रणालीमुळे ऐनवेळी होणारे नुकसान टळणार
मनपाचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष राहणार दक्ष
पुणे : पुण्यात पावसाचे प्रमाण जास्त आहे. पावसाळ्यात पुण्यात अनेकदा पूरस्थिती ओढवते. गेल्या वर्षी झालेल्या पावसामुळे पुण्यात हाहाकार उडाला होता. धरणातून अचानक पाणी सोडण्यात आल्यामुळे पूरस्थिती ओढवली होती. या घटनेची पुनरावृत्ती या वर्षी होऊ नये यासाठी पाटबंधारे विभागातर्फे वापरल्या जाणार्या आरटीडीएएस (रियल टाइम डाटा एक्युजेशन सिस्टम) प्रणालीमुळे मनपाला धरणातून पाणी विसर्गाची माहिती तीन दिवस आधी मिळणार आहे. त्यामुळे तातडीने उपाय योजना करण्यास महानगर पालिकेच्या यंत्रणेला शक्य होणार आहे.
विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली मान्सूनपूर्व तयारी विभागस्तरीय आढावा बैठक मंगळवारी झाली. यावेळी पुणे व पिंपरी-चिंचवड पोलिस, पिंपरी-चिंचवड मनपा, पुणे जिल्हा परिषद, पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम, जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी तसेच पुणे मनपाचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे व आपत्ती निवारण कक्षाचे प्रमुख गणेश सोनुने व अन्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी सर्व विभागांना विविध सूचना देण्यात आल्या.
पुण्यात पावसाळ्यात दरवर्षी मुळा मुठा नदीला पूर येतो. धरण परिसरात पाणी जास्त झाल्याने धरणातून अचानक सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नदी किनार्यावरील घरांमध्ये पाणी घुसून पूरस्थिती निर्माण होत होती. दरम्यान पाटबंधारे विभागामार्फत अचानक सोडण्यात येणार्या पाण्याची माहिती मनपाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला मिळत नव्हती. त्यामुळे नागरिकांना सूचना देणे शक्य होत नव्हते. त्यामुळे मोठे नुकसान होत होते. मात्र यावर मात करण्यासाठी पाटबंधारे विभागामार्फत आता धरणांमध्ये आरटीडीएएस प्रणालीचा उपयोग केला जात आहे.
या प्रणालीमुळे धरणांची योग्य माहिती मिळत असून धरण परिसरात होणारा पाऊस, धरणामध्ये जमा होणारे पाणी व धरणातील पाणी साठ्यात होणारी वाढ यावरून धरणातून कधी आणि किती पाण्याचा विसर्ग करावा लागेल,याची सर्व माहिती ही या नव्या यंत्रणेमुळे मिळणार असल्याने धरणातून पाणी कधी सोडण्यात येईल, याची माहिती तीन दिवसांपूर्वी महापालिकेला मिळणार आहे. त्यामुळे त्यानुसार यंत्रणा सज्ज ठेवून नागरिकांना वेळत सूचना पालिकेच्या आपत्तीनिवारण विभागाला नागरिकांना देणे शक्य होणार आहे.