सासवड : छत्रपती संभाजी महाराज हे बुद्धिमान, संस्कृतचे गाढे अभ्यासक होते. त्यांनी संस्कृतमध्ये लिखाण केले. त्यांना इंग्रजीचे ज्ञान होते आणि हिंदीमध्येही त्यांनी ग्रंथरचना केली. धर्मरक्षक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी रयतेवर वात्सल्य, प्रेम केले. त्याच मार्गावर राज्य शासन वाटचाल करीत आहे. पुरंदर किल्ल्यावरील माची आणि छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झालेल्या वाड्याच्या भिंतींची पुनर्बांधणी, संवर्धन आणि जतनाच्या अनुषंगाने लष्कराशी चर्चा करून सकारात्मक प्रयत्न करू, अशी ग्वाही राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी दिली. (Pune News Update)
किल्ले पुरंदर येथे छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार आणि मराठी भाषा व उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्या वेळी मंत्री अॅड. शेलार बोलत होते.
कार्यक्रमास आमदार विजय शिवतारे, माजी आमदार संजय जगताप, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल (निवृत्त) स. दै. हंगे, पुरातत्व विभागाचे सहायक संचालक डॉ. विलास वाहणे, तहसीलदार विक्रम रजपूत, उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे, पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, सासवड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण, पुरंदर प्रतिष्ठानचे प्रशांत पाटणे, योगेश खेनट आदी उपस्थित होते.
मंत्री अॅड. शेलार म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव आणि पराक्रम महाराष्ट्रासोबतच संपूर्ण भारताला परिचयाचा आहे. संभाजी महाराज प्रचंड पराक्रमी, बुद्धिमान आणि संवेदनशील होते. बालपणात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत मोहिमा, लढाया, स्वार्यांवर गेल्यामुळे त्यांना पराक्रमाचे बाळकडू मिळाले. त्यांच्या शौर्यात प्रचंड ताकद असल्यामुळे त्यांनी बलाढ्य आणि क्रूर अशा औरंगजेबाशी लढताना त्याला 9 वर्षे सळो की पळो केले.
महाराष्ट्रातील संभाजी महाराजांचा सर्वांत उंच पुतळा रत्नागिरीत असल्याचे पाहायला मिळेल. छत्रपती संभाजी महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील कसबा या गावात संभाजी महाराजांचे जागतिक दर्जाचे स्मारक राज्य शासनाच्या वतीने उभारण्यात येईल, अशी घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली.
आमदार विजय शिवतारे यांनी पुरंदर तालुक्याला प्रचंड ऐतिहासिक वारसा असल्याचे सांगून पुरंदर किल्ल्याचा विकास आराखडा व्हावा, अशी मागणी केली. यावेळी मंत्री अॅड. शेलार यांच्या हस्ते पुरंदर प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारे पुरस्कार प्रदान करण्यात आले.प्रास्ताविक पुरंदर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत पाटणे यांनी केले. सूत्रसंचालन रविराज शिंदे यांनी केले. गटविकास अधिकारी पंकज शेळके यांनी आभार मानले.