

पुणे: महानगरपालिकेत ठेकेदारी पद्धतीने घेतलेले राज्य सुरक्षा मंडळाकडील सुरक्षा रक्षक महापालिकेच्या अन्य विभागात नियुक्त करताना लेखी परवानगीशिवाय करू नयेत. तसेच, मंडळाकडील रक्षकांचे 26 दिवसांऐवजी 40 दिवसांचे वेतन काढल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दिली.
महापालिकेने दीड वर्षापूर्वी अतिक्रमण विभागासाठी राज्य सुरक्षा मंडळाकडील 100 सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केली असून यात पाच बंदुकधारी रक्षकांचा समावेश आहे. अतिक्रमण कारवाईदरम्यान होणारा नागरिकांचा विरोध रोखण्यासाठी व कारवाई पूर्ण करण्यासाठी या सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. (Latest Pune News)
100 पैकी 30 रक्षकांची ड्युटी महापालिका भवन व महापालिकेच्या इतर विभागात केली असून त्यांच्या कामाची जबाबदारी ही सुरक्षा रक्षकांकडून केली जाते. गेल्या आठवड्यात राज्य सुरक्षा मंडळाकडील अनेक कर्मचार्यांचे वेतन 26 ऐवजी 40 दिवसांचे काढले जात असल्याचा प्रकार समोर आला होता.
यावरून अतिक्रमण व सुरक्षा विभागातील दोन अधिकार्यांत हाणामारी देखील झाली होती. हा प्रकार समोर आल्यावर या प्रकाराची गंभीर दखल महापालिका प्रशासनाने घेतली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेशअतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दिले आहे.
तसेच, राज्य सुरक्षा मंडळासोबत झालेला करार, रक्षकांचे चाळीस दिवसांचे वेतन, त्यांच्या ड्युटीच्या ठिकाणांसह नोंदी याची माहिती घेण्यात येत आहे. यात काही चुकीचे आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे देखील पृथ्वीराज यांनी सांगितले. यासह यापुढे राज्य सुरक्षा मंडळाच्या रक्षकांना अतिक्रमण विभागाव्यतिरिक्त महापालिकेच्या कुठल्याही विभागात काम देण्यापूर्वी लेखी परवानगी घेण्याचे आदेशही संबंधित विभागांना दिल्याचे पृथ्वीराज यांनी सांगितले.