Pune News : कचराप्रकरणी पालिका प्रशासन खडबडून जागं; अधिकार्‍यांना नोटीस

Pune News : कचराप्रकरणी पालिका प्रशासन खडबडून जागं; अधिकार्‍यांना नोटीस

पुणे; पुढारी वृत्तसेवा : रात्रीच्या अंधारात शहर व उपनगरातील रस्त्यावर व सार्वजनिक ठिकाणी कचर्‍याचे ढीग साचत असल्याचे व त्यापासून दुर्गंधी सुटत असल्याची वृत्तमालिका 'दैनिक पुढारी'ने प्रसिद्ध केली. या वृत्तानंतर महापालिकेचा घनकचरा विभाग खडबडून जागा झाला असून, याप्रकरणी सहायक आयुक्तांसह आरोग्य निरीक्षकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबविण्यात येणार्‍या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत नंबर येण्यासाठी महापालिकेकडून मागील काही वर्षांपासून विविध पातळ्यांवर उपाययोजना केल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून शहर कचरा पेट्यामुक्त (कंटेनरमुक्त) करण्यात आले आहे.

शहरातील कचरा घरोघरी जाऊन संकलित करण्यासाठी स्वच्छ संस्थेची नेमणूक करण्यात आली आहे. त्याशिवाय काही सामाजिक संस्थांही काम करतात. मात्र, कचरा देण्यासाठी स्वच्छ संस्थेच्या सेवकाला महिन्याला पैसे द्यावे लागतात. त्यामुळे अनेकजण त्यांना पैसे न देता रात्रीच्या अंधारात रस्त्याच्या कडेला, आडबाजूला आणि स्वच्छतागृहांच्या शेजारी कचरा फेकून देतात. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते, शिवाय महापालिकेच्या कंटेनरमुक्त उद्देशालाही हरताळ फासला जातो.

या संदर्भात दैनिक पुढारीने वृत्तमालिका प्रसिद्ध केल्यानंतर महापालिकेचा घनकचरा व्यवस्थापन विभाग खडबडून जागा झाला आहे. वृत्ताची कात्रणे जोडून घनकचरा विभागाच्या उपायुक्तांनी क्षेत्रीय कार्यालयांच्या सहायक आयुक्तांसह आरोग्य निरीक्षकांना नोटीस बजावल्या आहेत. तसेच रात्री टाकण्यात येणार्‍या कचर्‍यावर नियंत्रण आणण्यासाठी या विभागासाठी असलेल्या कर्मचार्‍यांपैकील 15 टक्के कर्मचार्‍यांची रात्री गस्त घालण्यासाठी व दंडात्मक कारवाई करण्यासाठी नेमणूक करण्याच्या सूचना केल्या आहेत.

दै. पुढारी प्रसिद्ध केलेल्या वृत्तांची कात्रणे संबंधित क्षेत्रीय कार्यालयांना पाठवून त्या जागा स्वच्छ करण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच रात्रीच्या वेळी गस्त घालून दंडात्मक कारवाई करण्याच्याही सूचना केल्या आहेत. व्यवसायिक स्वरूपाच्या कचर्‍यासाठी दुपारी चार ते रात्री 12 पर्यंत संकलनाची व्यवस्था केली जाणार आहे. यासाठी मागणीनुसार रात्रीच्या वेळी घंडागाड्याही उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तसेच कचरा टाकणार्‍यांना केल्या जाणार्‍या दंडाची रक्कम 180 वरून 500 रुपये केली जाणार आहे.

– संदीप कदम, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग, महापालिका.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news