

नितीन वाबळे
मुंढवा: एकीकडे केंद्र आणि राज्य शासन ऑलिम्पिक, आशियाई खेळांमध्ये देशातील खेळाडूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके मिळवावीत म्हणून कोट्यवधी रुपयांच्या घोषणा करत आहे. तर, दुसरीकडे पुण्याच्या मध्यवर्ती भागातील बी. टी. कवडे रस्ता परिसरातील पालिकेचे 'बाळासाहेब कवडे क्रीडांगण' मागील १० वर्षांहून अधिक काळापासून प्रशासकीय अनास्थेच्या गर्तेत सापडले आहे. खेळाडू घडवण्याऐवजी हे मैदान आता मद्यपी आणि समाजकंटकांचे आश्रयस्थान बनले असून, या ठिकाणी स्थानिक बालकांचा खेळण्याचा हक्क हिरावला गेला आहे.
सध्या या क्रीडांगणाची अवस्था अत्यंत भीषण झाली आहे. मैदानावर जागोजागी मोठे गवत आणि काटेरी झुडपे उगवली आहेत. नागरिकांना आणि लहान मुलांना व्यायामासाठी बसवलेले लोखंडी साहित्य गंजून व तुटून पूर्णपणे नादुरुस्त झाले आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, या क्रीडांगणाचे रूपांतर आता 'मद्यपींच्या अड्ड्यात' झाले आहे. येथे दिवसा तसेच रात्रीच्या वेळीही दारुड्यांच्या बैठका होत असल्याचे चित्र दिसत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, महापालिकेने मागील आठ ते दहा वर्षांत या क्रीडांगणाच्या दुरुस्तीच्या आणि सुशोभीकरणाच्या नावाखाली लाखो रुपयांचा निधी खर्च दाखवला आहे. मात्र, प्रत्येक वेळी कंत्राटदार आणि पालिका अधिकाऱ्यांच्या साट्यालोट्यामुळे काम नेहमी अपूर्णावस्थेतच राहिले आहे. क्रीडांगण पूर्ण क्षमतेने कधी सुरू होणार आहे, याविषयी पालिका अधिकाऱ्यांकडे विचारणा केल्यावर लवकरच क्रीडांगणाचे काम सुरू करणार आहोत, अशी उत्तरे दिली जातात.
‘या’ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळांना बसले कुलूप!
या क्रीडांगणाची जागा प्रशस्त असून, येथे इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतची शाळकरी मुले अनेक खेळांचा सराव करू शकत होती. मैदान सुस्थितीत असते, तर राष्ट्रीय खेळ खो-खो, कबड्डी आणि मल्लखांब तसेच आंतरराष्ट्रीय खेळ ॲथलेटिक्स (धावणे, लांब उडी), व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, हँडबॉल, फुटबॉल आणि तिरंदाजी असे खेळ मुलांना येथे खेळता आले असते. परंतु, मैदान पूर्णपणे खड्डे, गवत आणि दारूच्या बाटल्यांच्या विळख्यात गेल्यामुळे स्थानिक मुलांना या कोणत्याही खेळाचा लाभ घेता येत नाही.
स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संताप
पुण्यासारख्या स्मार्ट सिटीमध्ये एकीकडे मैदानांची कमतरता असताना हक्काचे क्रीडांगण धूळखात पडून असल्याने बी. टी. कवडे रस्ता परिसरातील पालकांमध्ये आणि क्रीडाप्रेमींमध्ये प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे. पालिकेने तत्काळ या मैदानावरील काटेरी झुडपे हटवून, मद्यपींचा बंदोबस्त करावा आणि क्रीडांगण खेळाडूंसाठी खुले करावे, अशी आक्रमक मागणी आता जोर धरू लागली आहे.
लवकरच खासगीकरण; आचारसंहितेनंतर निविदा
क्रीडांगणाची दुरुस्ती व देखभाल पालिकेच्या भवन विभागाने करावयाची असते. याविषयी आम्ही त्या विभागाला पत्राद्वारे वेळोवेळी कळवत असतो. पुढील काळात आम्ही क्रीडांगणे आउटसोर्समध्ये चालवण्यासाठी देणार आहोत. त्यासाठी आचारसंहिता संपली की त्याच्या निविदा काढणार आहोत. त्यामुळे पालिकेचे आर्थिक उत्पन्न पण वाढेल आणि मुलांना खेळण्यासाठी आवश्यक सुविधाही मिळतील. - डॉ. संतोष टेंगले, क्रीडा उपायुक्त, पुणे मनपा