Kondhwa School Drainage Problem: कोंढव्यातील संत गाडगे महाराज शाळेत अस्वच्छतेचे साम्राज्य; तुंबलेल्या ड्रेनेजमुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात

चार हजार विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात; दुर्गंधी, सांडपाणी आणि कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीबाबत पालकांची नाराजी
Kondhwa School Drainage Problem
Kondhwa School Drainage ProblemPudhari
Published on: 
Updated on: 

सुरेश मोरे

कोंढवा: कोंढवा खुर्दमधील संत गाडगे महाराज शाळेची झालेली दयनीय अवस्था विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने गंभीर बनली आहे. शाळेच्या परिसरातील ड्रेनेजलाइन गेल्या अनेक दिवसांपासून तुंबलेल्या अवस्थेत असल्याने दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. तब्बल चार हजारांच्या आसपास विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या या शाळेच्या परिसरातच अशा प्रकारची अस्वच्छता असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Kondhwa School Drainage Problem
Pune Book Fair 2026: पुणे जगाची ‘पुस्तकांची राजधानी’ व्हावे; २४ व्या पुणे बुक फेअरचे उद्घाटन

शाळेच्या आवारात मराठी माध्यमाच्या चार शाळा, उर्दू प्राथमिक व माध्यमिक शाळा, इंग्रजी माध्यमाची शाळा आणि आयटी विभाग, अशा एकूण सात शैक्षणिक घटकांमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे शाळेतील स्वच्छता, आरोग्य आणि मूलभूत सुविधा याकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र परिस्थिती वेगळीच असल्याचा आरोप विद्यार्थ्यांच्‍या पालकांकडून केला जात आहे.

Kondhwa School Drainage Problem
Sharadiya Navratri 2026: यंदा दहा दिवसांचा नवरात्रोत्सव; ११ ऑक्टोबरला घटस्थापना

तुंबलेल्या ड्रेनेजमुळे दुर्गंधीचा त्रास

गेल्या अनेक दिवसांपासून ड्रेनेजलाइन तुंबल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच शिक्षक व कर्मचाऱ्यांना या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. सांडपाण्याचा प्रश्न वेळीच मार्गी न लागल्यास डासांची उत्पत्ती, अस्वच्छता आणि साथीचे आजार पसरण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. एखादा संसर्गजन्य आजार विद्यार्थ्यांमध्ये पसरल्यास त्याचा परिणाम केवळ शाळेपुरता मर्यादित न राहता त्यांच्या कुटुंबीयांसह संपूर्ण परिसराला भोगावा लागू शकतो. त्यामुळे प्रशासनाने संभाव्य धोका निर्माण होण्याची वाट न पाहता तातडीने उपाययोजना करण्याची मागणी पालकांकडून होत आहे.

Kondhwa School Drainage Problem
Pune CNG Price: पुण्यात सीएनजीचा दर १०० रुपयांच्या पार; रिक्षाचालकांच्या आर्थिक अडचणी वाढल्या

शाळेतील शिपाई गैरहजर असल्याची पालकांची तक्रार

दरम्यान, शाळेतील शिपाई नियमितपणे हजर राहत नसल्याची तक्रारही काही पालकांनी केली आहे. शाळेच्या दैनंदिन व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेले कर्मचारीच उपलब्ध नसतील, तर विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि स्वच्छ वातावरण कसे मिळणार, असा सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे.

शिक्षण मंडळाकडून केवळ आश्वासने?

शाळेच्या विविध समस्यांबाबत शिक्षण मंडळाकडे तक्रारी केल्या असल्या तरी तक्रारी ऐकून घेण्यापलीकडे ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप पालकांकडून करण्यात येत आहे. दुसरीकडे, पालिका प्रशासनाकडूनही कायमस्वरूपी उपाय करण्याऐवजी केवळ तात्पुरती मलमपट्टी केली जात असल्याची नाराजी व्यक्त होत आहे. हजारो विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्न असताना प्रशासन आणखी किती दिवस केवळ तात्पुरत्या उपायांवर समाधान मानणार? असा संतप्त सवाल पालकांकडून उपस्थित होत आहे.

Kondhwa School Drainage Problem
Unaided Sports Grace Marks: ४४ विनाअनुदानित क्रीडा प्रकारांच्या ग्रेस गुणांची फाईल रखडली; विधानसभा उपाध्यक्षांच्या आदेशालाही केराची टोपली?

प्रशासनाला जाग कधी येणार?

एका बाजूला मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेत असलेली शाळा आणि दुसऱ्या बाजूला तुंबलेले ड्रेनेज, दुर्गंधी व अस्वच्छतेची समस्या अशी विरोधाभासी परिस्थिती निर्माण झाली आहे. संभाव्य आरोग्यधोका टाळण्यासाठी ड्रेनेजची कायमस्वरूपी दुरुस्ती, परिसराची स्वच्छता आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत काटेकोर व्यवस्था करण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ होण्यापूर्वी प्रशासनाने जागे होऊन तातडीने ठोस निर्णय घ्यावा. अन्यथा, पालक आणि नागरिकांकडून तीव्र आंदोलन छेडले जाण्याची शक्यता आहे. हजारो विद्यार्थ्यांचा प्रश्न असताना प्रशासनाची ही उदासीनता आणखी किती दिवस? हा प्रश्न आता पालक आणि नागरिकांकडून विचारला जात आहे.

शाळा परिसरातील शौचालयाची कामे सुरू केली असून, लवकरच कायमस्वरुपी कामे मार्गी लावण्यासाठी वरिष्ठ आधिकाऱ्यांशी बोलणी केली आहे. लवकरच कामे मार्गी लागतील.

सिमरन पीरजादे, उपअभियंता, मनपा, पुणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news