

पुणे: यंदाचा शारदीय नवरात्रोत्सव दहा दिवसांचा असणार आहे. तिथीच्या क्षयवृद्धीमुळे नवरात्रोत्सव कधी आठ किंवा दहा दिवसांचा साजरा होतो. यंदा सप्तमी तिथीची वृद्धी झाल्याने नवरात्रोत्सव दहा दिवसांचा असणार आहे. गेल्या वर्षीही म्हणजेच २०२५ मध्ये तृतीया तिथीची वृद्धी झाल्याने नवरात्रोत्सव दहा दिवसांचा होता. यंदा दि. ११ ते २० ऑक्टोबरदरम्यान नवरात्रोत्सव साजरा होणार असून, त्यासाठी सर्वत्र तयारीला वेग आला आहे.
आश्विन शुक्ल प्रतिपदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होते. यंदा रविवारी (दि. ११) नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार असून, याच दिवशी घटस्थापना केली जाणार आहे. या दिवशी दिवसभर वैधृति योग असला तरी पहाटे ४ वाजून ५६ मिनिटांपासून दुपारी १ वाजून ३५ मिनिटांपर्यंत कधीही घटस्थापना करता येईल, अशी माहिती पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली.
नवरात्रोत्सवात देवीला रोज एक माळ अर्पण करण्याची प्रथा आहे. यंदा नवरात्रोत्सव दहा दिवसांचा असल्याने रोज एक याप्रमाणे माळा अर्पण कराव्यात. तिथीची वृद्धी असल्याने दोन दिवसांच्या दोन स्वतंत्र माळा देवीला अर्पण कराव्यात. अनेकजण नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवस उपवास करतात. मात्र, काही कारणास्तव नऊ दिवस उपवास करणे शक्य नसल्यास नवरात्रोत्सवाच्या पहिल्या आणि शेवटच्या दिवशी उपवास करावा. हेही शक्य नसल्यास किमान अष्टमीच्या दिवशी उपवास करावा, असे दाते यांनी सांगितले.
विजयादशमी अर्थात दसऱ्याचा मुहूर्त दुपारी २ वाजून १९ मिनिटांपासून ३ वाजून ०६ मिनिटांपर्यंत आहे. या कालावधीत विजयादशमीची पूजा आणि इतर धार्मिक उपक्रम करता येतील, असेही दाते यांनी स्पष्ट केले. दाते म्हणाले, नवरात्रोत्सवापूर्वी अशौच आल्याने प्रतिपदेस घटस्थापना करता येत नसेल, तर अशौच संपल्यानंतर कमी दिवसांचे नवरात्र साजरे करता येते. सप्तरात्रोत्सवारंभ मंगळवारी (दि.१३), पंचरात्रोत्सवारंभ गुरुवारी (दि. १५), त्रिरात्रोत्सवारंभ शनिवारी (दि. १७) आणि एकरात्रोत्सवारंभ सोमवारी (दि. १९) असे पंचागांत दिलेल्या दिवशी कमी दिवसाचे नवरात्र साजरे करावे.
इतर देवांची रोजची पूजा करावी
नवरात्रोत्सवात देवीची मूर्ती किंवा टाक, यांची स्वतंत्र स्थापना करून पूजा केली जाते. काही ठिकाणी नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांत इतर देवांची पूजा केली जात नाही. मात्र, ही पद्धत योग्य नाही. पूजेतील इतर देवांची नेहमीप्रमाणे दररोज पूजा करावी. - मोहन दाते, पंचांगकर्ते
यंदाच्या नवरात्रोत्सवातील प्रमुख दिवस
ललिता पंचमी - गुरुवार, १५ ऑक्टोबर
सरस्वतीपूजन - शनिवार, १७ ऑक्टोबर
महालक्ष्मीपूजन (घागरी फुंकणे) - रविवार, १८ ऑक्टोबर
दुर्गाष्टमी, महाष्टमी उपवास - सोमवार, १९ ऑक्टोबर
विजयादशमी (दसरा), महानवमी,
नवरात्रोत्थापन - मंगळवार, २० ऑक्टोबर