

लोणावळा: मुंबई आणि पुणे या दोन प्रमुख शहरांना जोडणाऱ्या प्रवासात मोठा अडथळा ठरणाऱ्या खंडाळा घाटातील जीवघेणी वाहतूक कोंडी आता कायमस्वरूपी सुटण्याची चिन्हे दिसत आहेत. महाराष्ट्र शासनाने खालापूर ते लोणावळादरम्यान विकसित केलेल्या ‘मिसिंग लिंक’चे 1 मे रोजी लोकार्पण करण्यात आले असून, गेल्या आठवडाभरापासून या मार्गामुळे खंडाळा घाटातील वाहतूक कोंडी अक्षरशः इतिहासजमा झाल्याचे दिसून येत आहे.
या नवीन मिसिंग लिंकमुळे खंडाळा घाटातील अवघड चढ-उतार पूर्णपणे टाळणे शक्य झाले आहे. पूर्वी खालापूर ते लोणावळा हे अंतर पार करण्यासाठी प्रवाशांना मोठा वेळ लागत असे, मात्र आता हा प्रवास केवळ 7 ते 8 मिनिटांत पूर्ण होत आहे. गेल्या आठवडाभराच्या निरीक्षणात असे दिसून आले की, खंडाळा घाटात कुठेही वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या नाहीत.
सध्या या मार्गावरून अवजड वाहनांची वाहतूक सुरळीत सुरू असून, प्रवासी वाहनांची संख्या तुलनेने कमी असली तरी, बहुतांश पर्यटक ‘मिसिंग लिंक’च्या सुसाट प्रवासाला पसंती देत आहेत. यामुळे वाहनांच्या इंधनाची बचत होत असून, इंजीनवर येणारा लोडही कमी झाला आहे. एकूणच, ‘मिसिंग लिंक’मुळे मुंबई-पुणे प्रवास अधिक सुरक्षित आणि वेगवान झाला असला, तरी लोणावळ्यातील पर्यटन व्यवसायाला आता बदलत्या प्रवासाच्या पद्धतीनुसार स्वतःला अनुकूल करून घ्यावे लागणार आहे.
लोणावळ्याच्या व्यवसायावर ‘कभी खुशी, कभी गम’
सकारात्मक परिणाम : या नवीन बदलाचे लोणावळ्यातील पर्यटन आणि व्यापारी क्षेत्रावर संमिश्र परिणाम पाहायला मिळत आहेत. खंडाळा घाट आणि लोणावळा शहरातील दुहेरी वाहतूक कोंडीला कंटाळून अनेक पर्यटकांनी लोणावळ्याकडे पाठ फिरवली होती. आता कोंडीची समस्या सुटल्यामुळे हे पर्यटक पुन्हा एकदा लोणावळ्यातील पर्यटन स्थळे पाहण्यासाठी आणि प्रसिद्ध चिक्की खरेदीसाठी शहरात येतील, असा विश्वास स्थानिक व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
नकारात्मक परिणाम : दुसरीकडे, लोणावळा हे मुंबई-पुणे प्रवासात जेवण आणि अल्पोपहारासाठी हक्काचे ठिकाण होते. मात्र, जलद प्रवासामुळे अनेक प्रवासी आता लोणावळ्यात न थांबता थेट उर्से, रावेत किंवा वाकड परिसरातील उपहारगृहांना पसंती देत आहेत. यामुळे महामार्गालगतच्या हॉटेल व्यवसायावर काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
महामार्ग पोलिस, देवदुतांनी घेतला मोकळा श्वास
वाहतूक कोंडी सुटल्याचा सर्वाधिक आनंद महामार्ग पोलिसांना झाला आहे. बोरघाट आणि खंडाळा महामार्ग पोलिस तसेच महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान या मार्गावरील कोंडी फोडण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेत असत. अनेकदा 15-15 मिनिटांचे ‘ब्लॉक’ घेऊन वाहतूक सुरळीत करावी लागत असे. आता ही कसरत थांबल्याने पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. तसेच, ‘अपघातग््रास्तांच्या मदतीसाठी हेल्प फाउंडेशन’च्या कार्यकर्त्यांनाही या सुलभ वाहतुकीमुळे काहीशी विश्रांती मिळाली आहे.