पुणे: पुण्यात झालेल्या मोठ्या पावसामुळे खडकवासला धरण आणि पवना नदीतून मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आला. यामुळे मुठा नदीला मोठा पूर आला. पुराचे पाणी वाढूनही पुणे महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी नदीसुधार प्रकल्पाला (मुळा-मुठा रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट) संगमवाडी येथे कोणतीही बाधा झाली नाही. या पुरामुळे प्रकल्पाची रचना आणि तांत्रिक तयारी किती सक्षम आहे, याकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे. (Latest Pune News)
मुळा आणि मुठा या पुण्यातील प्रमुख नद्या आहेत. या दोन्ही नद्या भीमा नदीत विलीन होतात. या दोन्ही नद्यांचा पुणे पालिकेच्या हद्दीत साधारण 44 किलोमीटर प्रवास आहे. एकेकाळी पुण्याचे वैभव असलेल्या या नद्यांची अवस्था आज अत्यंत दयनीय झाली आहे. अव्यवस्थित शहरीकरण, प्रक्रिया न झालेले सांडपाणी, कचरा टाकणे आणि नदीपात्रातील अतिक्रमणामुळे नद्या अक्षरशः नाल्यात रूपांतरित झाल्या आहेत. या नद्यांच्या सुशोभीकरणासाठी महापालिकेने नदीसुधार प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पात नद्यांच्या किनार्यांचे सुशोभिकरण करण्यात येत आहे.
नदीसुधार प्रकल्पाचे संगमवाडी परिसरात मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे. वाढलेल्या पुराच्या पाण्यामुळे प्रकल्पाच्या संरचनेवर कोणताही परिणाम झाला नाही. या ठिकाणी नागरिकांना बसण्यासाठी घाट तयार करण्यात आला आहे. तर फिरण्यासाठी पथदेखील बांधण्यात आले आहेत. येथे झाडेदेखील लावण्यात आली आहेत. पुराच्या पाण्याचा या कामांना कोणताही फटका बसलेला नाही.
काय आहे नदीसुधार प्रकल्प ?
पुणे पालिकेने मार्च 2022 पासून नदीसुधार प्रकल्प हाती घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते याचे उद्घाटन झाले. अंदाजे साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प 11 टप्प्यांत पूर्ण केला जाणार असून, त्याची प्रेरणा अहमदाबादच्या साबरमती रिव्हरफ—ंट प्रकल्पातून घेतली आहे.
दृष्टिक्षेपात नदीसुधार प्रकल्प
पूर रोखण्यासाठी मजबूत तटबंदी उभारणे
नदीपात्रातील अडथळे (कॉजवे, विअर्स, चेक डॅम) दूर करणे
सांडपाणी थेट नदीत जाऊ नये म्हणून इंटरसेप्टर स्युअर व सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणे
नदीकाठावर सार्वजनिक क्षेत्र, उद्याने, फिरण्याचे मार्ग, सायकल ट्रॅक तयार करणे
शहरातील भागांना अधिक पूल आणि पादचारी मार्गांनी जोडणे
पर्यावरणपूरक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी नदीकाठावर सुविधा उभारणे