

पुणे : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ अर्थात एमएसबीटीईशी संलग्न अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, वास्तुकला परिषद आणि अल्पमुदतीच्या पदविका अभ्यासक्रमांच्या मंडळाशी संलग्नित संस्था तसेच स्वायत्त तंत्रनिकेतनांचे एनबीए ॲक्रिडिटेशन झालेले आहे आणि एक्सलंट दर्जा प्राप्त आहे, असे अभ्यासक्रम वगळून शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील प्रथम संस्था बाह्या तपासणी 24 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरदरम्यान बाह्य संस्था परीक्षण समितीमार्फत प्रत्यक्षपणे करण्यात येणार आहे.(Latest Pune News)
अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व वास्तुकला पदविका संस्थांसाठी एकूण 400 गुणांचे आणि शासन मान्यताप्राप्त अल्पमुदतीच्या पदविका अभ्यासक्रमाच्या संस्थासाठी एकूण 150 गुणांचे संस्था अवेक्षण होणार आहे. त्यानुसार मंडळाच्या नियमाप्रमाणे गुणांवर आधारित संस्थांच्या अभ्यासक्रमांना दर्जा देण्यात येणार आहे.
संस्था अवेक्षणासाठी मंडळामार्फत नेमण्यात आलेल्या बाह्य संस्था अवेक्षण समितीच्या सदस्यांना आवेक्षणासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे संस्थामार्फत उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. बाह्य संस्था अवेक्षण समितीचे आदेश संस्थांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. समितीशी संपर्क साधून संस्थाभेटीचे आयोजन करून संस्थेची सर्व माहिती आवश्यक त्या कागदपत्रांसह समितीस उपलब्ध करून देण्यात यावी.
याबाबतीत काही अडचण असल्यास संबंधित विभागीय कार्यालयांशी संपर्क साधावा. संस्था अवेक्षणादरम्यान समितीस सहकार्य करावे. ज्या संस्था दिलेल्या मुदतीत आवेक्षण पूर्ण करून घेण्याची जबाबदारी संस्थेच्या प्राचार्यांची राहील. ज्या संस्था दिलेल्या कालावधीत समितीमार्फत अवेक्षण करून घेणार नाहीत अशा संस्थेतील अभ्यासक्रमांबाबत असंलग्नतेची कार्यवाही करण्यात येणार असल्याचा इशारा देखील एमएसबीटीईचे सचिव उमेश नागदेवे यांनी दिला आहे.