

पारगाव : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शेवंतीच्या फुलांना समाधानकारक बाजारभाव मिळत असून, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे. दसऱ्यानंतर बाजारभावात काहीशी घसरण झाली असली, तरी दिवाळीच्या मागणीमुळे पुन्हा भाव टिकून आहेत.(Latest Pune News)
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील थोरांदळे परिसरात सध्या शेवंतीच्या फुलांची तोडणी जोरात सुरू आहे. या भागात पाणीटंचाई कायम असल्याने गुंडमळा, तुर्केमळा परिसरातील शेतकऱ्यांनी फुलशेतीकडे वळत शेवंतीचे उत्पादन घेतले आहे. गणेशोत्सव, नवरात्र आणि दिवाळी या सणासुदीच्या काळात फुलांना नेहमीच चांगला बाजारभाव मिळतो. दसऱ्याच्या काळात शेवंतीला किलोमागे दीडशे रुपये भाव मिळत होता. दिवाळीत त्यात आणखी वाढ होईल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. परंतु, सध्या बाजारभावात 50 रुपयांची घसरण झाली आहे.
थोरांदळे येथील प्रगतशील शेतकरी तानाजी गुंड यांनी विविध जातींच्या शेवंतीची शेती केली असून, सध्या काही फुलांना किलोमागे 50 रुपये, तर उच्च दर्जाच्या फुलांना 100 रुपये भाव मिळत आहे. ’बाजारभाव समाधानकारक असला तरी थोडी वाढ झाली तर शेतकऱ्यांना अधिक फायदा होईल,’ असे गुंड यांनी सांगितले.
या वर्षी पावसाळ्यात जोरदार पाऊस झाला. त्यानंतर परतीच्या पावसानेही अक्षरशः धुमाकूळ घातला. त्यामुळे झेंडू आणि शेवंतीच्या झाडांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तोडणीस आलेली फुले सडल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला.