पुणे जिल्ह्यातील अठरा हजारांवर कुटुंबांना पक्के घर

पुणे जिल्ह्यातील अठरा हजारांवर कुटुंबांना पक्के घर

समीर सय्यद

पुणे : संपूर्ण जिल्ह्यातील बेघर कुटुंबांना विविध योजनांच्या माध्यमातून पक्के घर दिले जात आहे. आजवर 1 हजार 202 कुटुंबांकडे घरकुल बांधण्यासाठी स्वतःची जागा नव्हती. त्यांना शासकीय जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

गेल्या पाच वर्षांत 23 हजार 398 घरकुलांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यातील 18 हजार 696 घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे.
जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेेमार्फत प्रधानमंत्री आवास ग्रामीण, रमाई आवास, शबरी आवास आणि पारधी आवास योजना राबविल्या जातात. बेघर व कच्च्या घरात वास्तव्यास असलेल्या कुटुंबांची प्रतीक्षा यादी तयार करण्यात आली आहे. त्यानुसार प्राधान्य क्रमानुसार घरकुल मंजूर केले जात आहे.

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणअंतर्गत 2017-18 मध्ये 1692 घरकुलांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यातील 1523 घरकुले पूर्ण झाली. परंतु, 2018-19 या वर्षात उद्दिष्ट तुलनेत कमी ठेवण्यात आले होते. त्यात 807 घरकुलांचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यातील 755 घरकुले पूर्ण झाली. 2019-20 या वर्षात चार हजार 909 घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यातील चार हजार 5 कुटुंबे पक्क्या घरात वास्तव्य करीत आहेत. 2020-21 मध्ये 3316 घरकुले मंजूर झाली होती. त्यातील 2941 जणांची घरकुले पूर्ण झाली. पाच वर्षांत सर्वात कमी तीन हजार 579 घरकुलांचे उद्दिष्ट 2021-22 मध्ये साध्य झाले. त्यातील केवळ 817 घरकुले पूर्ण झाली आहेत.

रमाई आवास योजना

रमाई आवास योजनेंतर्गत सहा हजार 703 कुटुंबांना घरकुल देण्यात आले. मात्र, 2020-21 मध्ये घरकुलांचे उद्दिष्टच देण्यात आले नव्हते. 2017 ते 2022 पर्यंत सात हजार 108 घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले. त्यातील सहा हजार 703 घरकुलांचे काम पूर्ण झाले. या योजनेंतर्गत नऊ लाभार्थ्यांना पंडित दीनदयाळ अभियानाअंतर्गत जागा खरेदीसाठी अर्थसाहाय्य मंजूर करण्यात आले. तसेच घरकुलासाठी जागा नसलेल्या 33 कुटुंबांना शासकीय जागा उपलब्ध करून देण्यात आली.

शबरी आवास योजना…

शबरी आवास योजनेंतर्गत 1 हजार 865 घरकुलांचे उद्दिष्ट होते. त्यातील 1 हजार 859 कुटुंबांचे घरकुल पूर्ण झाले. 2017 ते 2020 पर्यंतचे उद्दिष्ट साध्य करण्यात आले. 2020-21 मध्ये घरकुलाचे उद्दिष्ट नव्हते. 2021-22 या आर्थिक वर्षात 481 घरकुलांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यातील 475 घरकुले पूर्ण झाली. तर 25 कुटुंबांना शासकीय जागा उपलब्ध करून देण्यात आली.

पारधी आवास योजना…

जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये पारधी समाजाचे वास्तव्य असून, त्यांच्यासाठी पारधी आवास योजना 2017-18 ते 2018-19 मध्ये राबविण्यात आली. या दोन्ही वर्षी 61 घरकुलांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यातील पहिल्या वर्षी 33, तर दुसर्‍या वर्षी 60 घरकुले पूर्ण झाली आहेत.

निधी असूनही घरकुलांचे काम वेळेत पूर्ण होत नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या वतीने 75 दिवसांचा विशेष कार्यक्रम आखण्यात आला आहे. त्यात घरकुल मंजुरीचे उद्दिष्ट पूर्ण करणे, मंजूर घरकुलांचे काम पूर्ण करून घेणे, 'आवास प्लस'मधून कायमस्वरूपी यादी तयार करणे आदी कामे केली जाणार आहेत.
                  – शालिनी कडू, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जि. प. पुणे.

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण

  • उद्दिष्ट : 14303
  • साध्य : 10041

रमाई आवास योजना

  • उद्दिष्ट : 7108
  • साध्य : 6703

शबरी आवास योजना

  • उद्दिष्ट : 1865
  • साध्य : 1859

पारधी आवास योजना

  • उद्दिष्ट :122
  • साध्य : 93

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news