

पुणे: पुण्यातील बहुप्रतीक्षित आणि सर्वांत लांब अशी ओळख असणार्या सिंहगड पुलाची एक बाजू 1 मे रोजी खुली करण्यात आली. पुलाचे उद्घाटन झाल्यावर दुसरी बाजू दोन महिन्यांत सुरू करण्याचे महानगरपालिकेचे नियोजन होते. मात्र, पावसामुळे महानगरपालिकेचे दुसरी बाजू पूर्ण करण्याचे नियोजन फिस्कटले आहे. ही दुसरी बाजू सुरू व्हायला आणखी वेळ लागणार आहे.
पुण्यातील सिंहगड रस्त्यावरी विठ्ठलवाडी ते फनटाइम चित्रपटगृहादरम्यानच्या उड्डाणपुलाचे काम सहा महिन्यांआधी पूर्ण झाल्याने 1 मे रोजी पुलाची एक बाजू वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. पुलाची दुसरी बाजू जुलै महिन्यात सुरू करण्याचे पालिकेचे नियोजन होते. (Latest Pune News)
त्यादृष्टीने तयारीदेखील सुरू करण्यात आली होती. एक बाजू पूर्ण झाल्याने तेथील कामगार व अभियंत्रे पुलाची दुसरी बाजू पूर्ण करण्याच्या कामी लागले. हा पूल जवळपास पूर्ण झाला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे या कामात अडथळे येत आहेत.
मुरमामुळे चिखल
सिंहगड पुलाच्या दुसर्या बाजूचे काम वेगाने सुरू आहे. पुलावरील रस्ता तयार करण्यासाठी मुरूम टाकण्यात आला आहे. यामुळे चिखल झाला असून, पुढील कामे करण्यास अडचणी येत आहेत. पावसाचा जोर कमी झाल्यावर पुन्हा काम वेगाने सुरू करण्यात येणार असल्याची माहिती भवन विभागाचे उपायुक्त युवराज देशमुख यांनी दिली.