

पुणे : मान्सूनची प्रगती यंदा प्रचंड वेगाने होत आहे. तो १३ मे रोजी अंदमान-निकोबार बेटांवर येत आहे. त्यापुढे पाच दिवसांतच अरबी समुद्रात आगमन होईल, असा नवा अंदाज रविवारी (दि.११) हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे केरळमध्ये तो २३ ते २५ मे दरम्यान दाखल होऊ शकतो, असा अंदाज शास्त्रज्ञांनी दिला आहे. तसेच राज्यातही १५ मे पर्यंत पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
नैर्ऋत्य मान्सून १३ मे च्या सुमारास दक्षिण अंदमान समुद्र, आग्नेय बंगालच्या उपसागराच्या काही भागांत आणि निकोबार बेटांवर येण्याची शक्यता हवामान विभागाने शनिवारी वर्तविली होती. रविवारी पुन्हा मान्सून प्रचंड वेगाने पुढे येणार असल्याचा अंदाज जाहीर करण्यात आला. यात म्हटले आहे की, मान्सून येत्या ४ ते ५ दिवसांत दक्षिण अरबी समुद्राच्या काही भागांत, मालदीव आणि कोमोरिन क्षेत्रात दाखल होईल.
मान्सून लवकर येण्याच्या तयारीत असल्याने मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली आहे. १२ ते १५ मे दरम्यान संपूर्ण देशाला यलो अलर्ट देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील सर्वच भागांत १२ ते १५ मे पर्यंत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. त्यातही उद्या (दि.१२) पावसाचा जोर जास्त राहील, असा इशारा देण्यात आला आहे.
पुढील १५ दिवस म्हणजे २५ ते २६ मे पर्यंत पूर्वमोसमी गडगडाटी अवकाळी पावसामुळे दिवसाच्या कमाल तापमानासह पहाटेच्या किमान तापमानातही घट होईल. त्यामुळे दिवसा आणि रात्री जाणवणारा असह्य उकाडा जास्त न जाणवता आल्हाददायक वातावरण राहील, असाही अंदाज देण्यात आला आहे.