

पुणे : पुढारी वृत्तसेवा
मान्सून 23 सप्टेंबरपासून पश्चिम राजस्थानातून परतीच्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. यंदा तो नेहमीपेक्षा चार दिवस उशिरा निघत आहे, अशी घोषणा हवामान विभागाने शुक्रवारी (दि.20) सायंकाळी केली. दरम्यान, राज्यात 21 ते 25 सप्टेंबरदरम्यान मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यंदा मान्सून लांबणार की वेळेवर परतीच्या प्रवासाला निघणार, अशी मतमतांतरे शास्त्रज्ञांमध्ये होती. कारण, उत्तर भारतासह राजस्थानात तशी स्थिती दिसत नव्हती. दरवर्षी पूर्व किंवा पश्चिम राजस्थानातून मान्सून परतीला निघतो. या वर्षी तो 23 सप्टेंबर म्हणजे चार दिवस उशिरा परतीच्या प्रवासाला निघत आहे. तशी स्थिती पश्चिम राजस्थानात दिसून आल्याने हवामान विभागाने ही घोषणा केली.
पश्चिम राजस्थानच्या काही भागांतून मान्सूनला माघारीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसते. तसेच कच्छमध्येही तशीच स्थिती दिसून आल्याने 23 सप्टेंबरपासून मान्सून या दोन्ही भागांतून परतीच्या प्रवासाला निघेल. दरम्यान, 21 सप्टेंबरच्या आसपास उत्तर अंदमान समुद्र आणि परिसरात वरच्या हवेत चक्रीय स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरात झालेल्या स्थितीमुळे राज्यात 21 ते 25 सप्टेंबरदम्यान राज्यात सर्वत्र पावसाचा अंदाज आहे. मात्र, तो विखुरलेल्या अवस्थेत असेल. सर्वत्र सारखा पडणार नाही. प्रामुख्याने 24 आणि 25 रोजी मध्य महाराष्ट्र व कोकणात मुसळधार पावसाची शक्यता आहे, तर मराठवाडा व विदर्भात 25 व 26 रोजी मुसळधार पावसाचा अंदाज आहे.