

पुणे: यंदाच्या हंगामात मान्सून दाखल झाल्यापासून तो प्रथमच मनसोक्त बरसला. शनिवारी सुरू झालेला पाऊस २४ तास उलटले, तरी सुरूच होता. संततधार पावसाने २४ तासांत शहराला चिंब भिजविले. त्यामुळे जनजीवन काहीसे विस्कळीत झाले.
रविवारी भल्या पहाटे स्वारगेटला पाण्याने वेढले. तेथे प्रवाशांची तारांबळ उडाली होती. कात्रज तलावात महिला बुडाली; मात्र तिचा शोध पोलिसांसह अग्निशमन दलाला लागला नव्हता. २४ तासांत शहरात १९ झाडपडीच्या घटना घडल्या आहेत.
शहरात यंदा मान्सून ९ जून रोजी दाखल झाला. मात्र, त्यानंतर मोठ्या पावसाची नोंद जून महिनाभर झाली नाही. जुलैमध्येच पावसाने जोर धरला. मात्र, १५ ते २० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला नाही. शुक्रवारी दि.१२ जुलै रोजी शहरात पावसाला सुरुवात झाली. त्या दिवशी ७.५ मिमी पाऊस झाला, तर १३ जुलै रोजी सलग दुसऱ्या दिवशी संततधार पावसाला सुरुवात झाली.
शनिवारी शहरात दुपारी ३ ते ४ या वेळेत पाऊस झाला. पण, फक्त ५ मिमीची नोंद झाली होती. तर, २४ तासांत शहरात अवघा १२.५ मिमी पाऊस झाला होता. मात्र, शनिवारी रात्री ९ नंतर संततधार पावासाने जोर पकडला. वारा नाही, विजांचा कडकडाट नाही. एका वेगाने हळुवारपणे पाऊस उत्तररात्री आणि पहाटेपर्यंत पडतच होता. रविवारची पहाट उजाडली ती पावसाने. शनिवारी रात्री ९ वाजता सुरू झालेला पाऊस रविवारी सकाळी १० वाजता म्हणजे तब्बल बारा तासांनी थांबला. मात्र, दुपारी १ ते ३ पर्यंत अधूनमधून पावसाची जोरदार सर येतच होती. सायंकाळी ५ व ६ वाजता पुन्हा पाऊस आला, त्यानंतर उघडीप मिळाली होती.
गेल्या २४ तासांत शहरात पावसामुळे वेगवेगळ्या भागांत१९ झाडपडीच्या घटना घडल्या. मात्र, यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. झाडे कोसळल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेत रस्त्यात पडलेल्या फांद्या हटवून रस्ते वाहतुकीस खुले करून दिले.
कोथरूड एमआयटी महाविद्यालयाजवळ, कोंढव्यातील एनआयबीएम रस्ता, गंज पेठ, हडपसर भागातील १५ नंबर चौक, कोथरूड बसडेपो, पाषाण, जनवाडीतील अरुण कदम चौक, प्रभात रस्ता, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, वडारवाडी, कसबा पेठ, बिबवेवाडी, पाषाण येथील वीरभद्रनगर, कोथरूडमधील सुतार दवाखाना, महंमदवाडी, नन्हे भागात अभिनव कॉलेजजवळ, मुकुंदनगर, विश्रांतवाडी
कात्रज भागातील गुजरवाडी परिसरात असलेल्या तलावात एक महिला बुडाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या कात्रज केंद्रातील जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन महिलेचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, ती रविवारपर्यंत सापडली नव्हती. बुडालेल्या महिलेचे नाव मात्र समजले नाही.