

पुणे: गुरुवारी 22 मे रोजी मान्सून अरबी समुद्रातून केरळच्या किनारपट्टीच्या अगदी जवळ प्रवेश केला तर मान्सूनची दुसरी शाखा ही पश्चिम बंगालच्या किनारपट्टी जवळ येऊन धडकली आहे. त्यामुळे संपूर्ण देशभरात यंदा मान्सून अतिशय वेगाने पोहोचण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
आगामी काही दिवसात तो संपूर्ण दक्षिण भारतासह महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल काबीज करून मध्य भारत आणि पूर्वोत्तर भारत गाठून दिल्लीपर्यंत प्रचंड वेगाने मजल मारेल असे चित्र यंदा दिसत आहे. यंदा अतिशय विक्रमी वेळात तो संपूर्ण देश काबीज करण्याच्या तयारी त दिसत आहे. (Latest Pune News)
मानसून दोन शाखांनी भारतात प्रवेश केला..
अंदमान निकोबार सागरात त्याची निर्मिती होते आणि तो प्रथम हिंदी महासागरातून अरबी समुद्रात येतो पुढे अरबी समुद्रातूनच केरळमध्ये प्रवेश करतो.त्यानंतर तो बंगालच्या उपसागरातून पूर्व किनारपट्टीकडून पश्चिम बंगाल राज्यात प्रवेश करतो.
ही शाखा थोडी उशिरा सक्रिय होते मात्र यंदा मान्सून सक्रिय झाल्यापासून अवघ्या दोनच दिवसात बंगालच्या शाखेने जोरदार मुसंडी मारत गुरुवारी पश्चिम बंगालच्या सीमेवर जवळ त्याने प्रवेश केला.
भारतात एकाच वेळी दोन्ही शाखाद्वारे मान्सून जोरदार मुसंडी मारत आहे. त्यामुळे अल्प कालावधीत संपूर्ण देश मान्सून व्यापून टाकेल असे चित्र निर्माण झाले आहे. देशात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे मान्सून जबरदस्त वेगाने मुसंडी मारत आहे असे तज्ञांचे मत आहे.
केरळच्या किनारपट्टीवर तो सध्या थांबलेला असून आगामी 24 ते 48 तासात तो केरळ राज्यात दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.साधारण 25 मे पर्यंत तो केरळ किनारपट्टीवर येईल असा अंदाज आहे तर पश्चिम बंगाल मध्ये तो आगामी 24 तासातच दाखल होईल असाही अंदाज दिसत आहे.
महाराष्ट्रात मान्सून मेच्या अखेरीस म्हणजे 28 ते 31 मे च्या दरम्यान दाखल होऊ शकतो असा अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी दिला आहे दरवर्षी मुंबई पुण्यात मान्सून दहा ते बारा जून च्या दरम्यान दाखल होतो मात्र यंदा तो 31 मे ते 1 जून च्या दरम्यान महाराष्ट्रात दाखल होईल असा अंदाज आहे.
उन्हाळी हंगामात मे महिन्यात राज्यातील विविध भागात झालेला एकूण पाऊस (मी मी)
सातारा 337
रत्नागिरी 309
माथेरान 224
पुणे 142.7
कोल्हापूर 157.2
ठाणे 129.4
नांदेड 104.4
नाशिक 151
धाराशिव 166.9
बुलढाणा 124
जेऊर 157.4
सांगली 183.1
हरणाई 80.7
बारामती 68.3
जळगाव 23.4
अहिल्यानगर 89
सोलापूर 119
बीड 62.8