

पुणे: महाराष्ट्र संघटित गुन्हेगारीविरोधी कायदा (मोक्का) या गुन्ह्यातील सराईताने परवानगी न घेता रॅली काढून आरडाओरडा केल्याप्रकरणात सराईत सूरज ठोंबरेसह 13 जणांच्या टोळक्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार नारायण पेठ येथील मुरलीधर हॉटेल ते भिडे पूलदरम्यान दि. 24 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडला.
सूरज ठोंबरे, संकेत यादव, ओंकार कुडले, राजन काळभोर, आकाश सासवडे, शुभम पवळे, राहुल कांबळे, निल चव्हाण, शक्ती बनसोडे, दादू तात्याबा पडळकर, नरसिंग भिमा माने, प्रफुल्ल वाघमारे, ओंकार जाधव अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. (Latest Pune News)
दि. 24 ऑगस्ट रोजी सायंकाळी कारागृहाबाहेर आल्यानंतर सूरज ठोंबरे याच्यासोबत टोळक्याने चारचाकी, दुचाकीवरून रॅली काढून आरडाओरड करून शांततेचा भंग केला. त्यांनी कोणत्याही प्रकारची पवानगी घेतली नाही. त्यांनी बेकायदा जमाव जमवून आदेशाचा भंग केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणात विश्रामबाग, डेक्कन पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पथकाने सूरज ठोंबरेसह तिघांना ताब्यात घेतले. या प्रकरणात गुन्हे शाखेने त्यांची परिसरातून धिंड काढली.
गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे, खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश संखे, विश्रामबाग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पांढरे, डेक्कन पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरिशा निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक राजेश माळेगावे यांच्या पथकाने ही कारवाई केली.