

पुणे: बंडगार्डन रस्त्यावरील एका दुचाकीच्या शोरूम, वर्कशॉपला सोमवारी (दि.25) रात्री आग लागली. या आगीत 60 दुचाकी जळाल्या असून, अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन वेळीच आग आटोक्यात आणली.
बंडगार्डन रस्त्यावरील ताराबाग चौकात एका नामांकित कंपनीचे दुचाकी विक्रीचे शोरूम आहे. तेथेच वर्कशॉपदेखील आहे. तीन मजली इमारतीत तळमजल्यावर असलेल्या शोरूममधून सोमवारी रात्री मोठ्या प्रमाणावर धूर येऊ लागला. (Latest Pune News)
काही क्षणात दुचाकी विक्री दालनातील दुचाकींनी पेट घेतल्याने आग भडकली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या नायडू आणि येरवडा केंद्रातील जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. आग भडकल्याने अग्निशमन दलाच्या मुख्य केंद्रातून टँकरही मागविण्यात आले. शोरूममधील दुचाकींनी पेट घेतल्याने मोठ्या प्रमाणावर धूर झाला होता. जवानांनी शोरूमचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला.
आतमध्ये कोणी अडकले नसल्याची खात्री केली. त्यानंतर एक जण शोरूममध्ये असल्याची माहिती मिळाली. जवानांनी एकाला सुखरूप बाहेर काढून पाण्याचा मारा सुरू केला. धूर मोठ्या प्रमाणावर झाल्याने जवानांनी सुरक्षेचा उपाय म्हणून श्वसनयंत्रणा परिधान केली.
जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. आगीत इलेक्ट्रीक दुचाकींसह एकूण 60 दुचाकी जळाल्या. शोरूममधील साहित्य, टेबल, खुर्ची, कागदपत्रे जळाली. आगीमागचे कारण समजू शकले नाही, अशी माहिती अग्निशमन दलाचे वरिष्ठ अधिकारी विजय भिलारे यांनी दिली.
अग्निशमन अधिकारी भिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी आग आटोक्यात आणली. आग लागल्याची माहिती पोलिस आणि महावितरणच्या कर्मचार्यांनी तेथे भेट दिली. जवानांनी दुचाकी विक्री दालनातील आग अर्ध्या तासात आटोक्यात आणल्याने गंभीर दुर्घटना टळली.