

राजगुरुनगर: खेड तालुक्यातील प्रचंड रहदारीचा व दुर्गम व पश्चिम पट्ट्यातील 30-40 गावांना जोडणार्या शिरोली-पाईट-आंबोली रस्त्याची खड्डे पडून चाळण झाली आहे. प्रमुख जिल्हा मार्ग असलेल्या चाळीस किलोमीटरच्या रस्त्यावर कणभर डांबर, खडी शिल्लक राहिलेली नाही.
परिसरात आठ-दहा गावातील सरपंच व अन्य पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन प्रशासनाला पत्र दिल्यानंतर जाग आलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजवून मलमपट्टी करण्याचे काम सुरू केले आहे.
शिरोली ते पाईट आणि पाईट ते आंबोली-वांद्रे अशा दोन टप्प्यात विभागलेल्या रस्त्याची लांबी तब्बल 40-45 किलोमीटर ऐवढी आहे. तालुक्यातील सर्वाधिक पावसाचा भाग असलेला हा परिसर आहे. पावसामुळे खड्डे पडून रस्त्यांची पूर्णपणे चाळण झाली आहे. प्रमुख जिल्हा मार्ग असलेला हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. 40-45 किलो मीटरचा प्रवास करण्यासाठी दोन तास लागतात.
लहान-मोठ्या वाहनांना खड्डे चुकवणे वाहनचालकांना कठीण होत आहे. जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनांचे मोठे नुकसान होत आहे. या भागाचे खासदार डॉ.अमोल कोल्हे तसेच आमदार बाबाजी काळे यांनी रस्त्याच्या समस्येबाबत उपाययोजना केलेली नाही. स्थानिक लोक या रस्त्यावरून प्रवास करून रोज आपली हाडे खिळखीळी करून घेत आहेत.
दुरुस्तीसाठी अपुरा निधी
पाईट ते आंबोली परिसरातील रस्त्याची स्थिती तर भयानक आहे. यामुळे या भागातील सरपंच व सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन तालुका प्रशासनाला पत्र दिल्यानंतर सध्या पाईट ते आंबोली रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू झाले आहे. परंतु, अपेक्षित निधी उपलब्ध नसल्याने केवळ छोटे व किरकोळ खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. मोठे खड्डे दुरूस्तीसाठी निधी उपलब्ध नसल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे म्हणने आहे. यामुळेच खड्डेमय रस्त्यावरून या भागातील नागरिकांना प्रवास करावा लागणार आहे.