

Nagpur Crime Girlfriend Stabs Boyfriend
जितेंद्र शिंगाडे
नागपूर : लग्नाचा तगादा लावणाऱ्या नातेवाईक प्रियकराचा त्याच्याच प्रेयसीने भोसकून खून केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. आपला गुन्हा उघडकीस येऊ नये, यासाठी प्रेयसीने स्वतःच्या शरीरावर चाकूने वार करून हल्ल्याचा बनाव रचण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पोलिसांच्या कसून चौकशीत प्रेयसीनेच प्रियकराची हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. बालाजी कल्याने असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
नांदेड जिल्ह्यातील नातेवाईक असलेले प्रियकर आणि प्रेयसी नागपूरमध्ये रोजगार आणि शिक्षणासाठी आले होते. यातील प्रेयसी बीएएमएसच्या अखेरच्या वर्षाला होती. मृत प्रियकर बालाजी कल्याने हा पोलीस भरतीसाठी तयारी करत होता, दोघांचे गेल्या 5 वर्षांपासून प्रेमसंबंध होते, मात्र गेल्या काही दिवसांत प्रियकराने प्रेयसीला लग्नाचा तगादा लावला. प्रेयसीच्या वडिलांना फोन करून लग्न लवकर लावून द्या, अन्यथा माझ्या पार्थिवाच्या दर्शनासाठी तुम्हाला नागपूर यावं लागेल, अशी धमकीही दिली होती. यामुळे प्रेयसी संतापली होती.
बुधवारी रात्री प्रेयसी प्रियकराच्या रूममध्ये आली. बालाजी आणि त्याचा रूम-पार्टनर तिघांच्या पण रात्री उशिरा पर्यंत गप्पा झाल्या. त्यानंतर बालाजी आणि प्रेयसी एका रूममध्ये गेले. काही वेळानंतर रूममधून ओरडण्याचा आवाज आला. मित्राने रूमचा दरवाजा ठोठावला मात्र प्रेयसीने दरवाजा उघडला नाही. 20 मिनिटांनी जेव्हा दरवाजा उघडला तेव्हा दोघेपण रक्तबंबाळ अवस्थेत निपचित पडून असल्याचं दिसलं. मित्राने घरमालकाच्या मदतीने दोघांना पण उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी बालाजीला तपासून मृत घोषित केले तर जखमी प्रेयसीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नंदनवन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रियकराच्या अंगावर चाकूच्या खोल जखमा होत्या. दोघांमध्ये वाद झाला असावा यातून प्रियकराचा खून झाला असावा, असा पोलिसांनी प्राथमिक अंदाज व्यक्त केला. आपलं बिंग फुटू नये म्हणून प्रेयसीने प्रियकराने माझ्यावर हल्ला करत स्वतःवर चाकूने वार करत आत्महत्या केल्याचा बनाव केला. प्रेयसी रुग्णालयात उपचार घेत असल्याने तिच्यावर दडपण येऊ नये म्हणून पोलिसांनी सुरुवातीला तांत्रिक तपास केला. मात्र प्रियकराच्या शरीरावर असणाऱ्या खोल जखमांमुळे पोलिसांना दाट संशय प्रेयसीवर होता. अखेर पोलिसी खाक्या दाखविल्यावर प्रेयसीने हत्या केल्याची कबुली दिली, अशी माहिती नंदनवन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनायक कोळी यांनी दिली.
प्रियकराचा खून करणाऱ्या प्रेयसीवर नंदनवन पोलिस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिला डिस्चार्ज मिळाल्यानंतर पोलीस ताब्यात घेतील, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली. गेली पाच वर्षे प्रेमाच्या आणाभाका घेतलेल्या प्रेयसीने अशा प्रकारे आपल्या प्रियकराची हत्या केल्याच्या घटनेने समाजमन सुन्न झाले आहे. या प्रकरणी मयत प्रियकर बालाजी याच्या भावाने दिलेल्या तक्रारीनुसार नंदनवन पोलीस स्टेशनमध्ये या प्रेयसीविरुद्ध भारतीय दंड विधान कलम ३०२ (हत्या) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.