

PIB Fact Check about Post SMS :
सणासुदीच्या काळात पोस्टाद्वारे अनेकांचे अनेक पार्सल येतात. अनेक लोकं फराळ, भेटवस्तू या पोस्टाच्या माध्यमातून आपल्या आप्त स्वकीयांना, नाकेवाईकांना पाठवत असतात. मात्र याचाच फायदा उचलत काहीजण फसवणूक करण्याच्या तयारीत आहेत.
जर तुम्हाला तुमचं पॅकेज वेअरहाऊसमध्ये आलं आहे. तुम्ही तुमचा पत्ता २४ तासाच्या आत अपडेट करा नाहीतर हे पॅकेज माघारी जाऊ शकतं असा SMS आला असेल तर सावधान! हा SMS हा पोस्टाकडून आल्याचं भासवलं जात आहे. आता अशा SMS चे पीआयबी इंडिया फॅक्ट चेक केलं असून त्यात हा SMS फेक असल्याचं आढळून आलं आहे.
याबाबत पीआयबी इंडियानं आपल्या फॅक्ट चेकबाबत माहिती देणाऱ्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक ट्वीट केलं आहे. त्यांनी हा सर्क्युलेट होणाऱ्या SMS चा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'तुम्हाला देखील तुमचं पार्सल वेअरहाऊसमध्ये आलं आहे. २४ तासाच्या आत तुमचा पत्ता खालील लिंकवरून अपडेट करा नाहीतर हे पार्सल परत जाईल असा SMS आला आहे का? सावधान! हा SMS फेक आहे. इंडिया पोस्ट कधीही अशाप्रकारचा SMS पाठवून तुम्हाला तुमचा पत्ता अपडेट करायला सांगत नाही. अशा फसवणूक करणाऱ्या लिंकरव कधी क्लिक करू नका.'
काय आहे फसवणूक करणारा SMS?
फसवणूक करणाऱ्या या SMS मध्ये वरच्या बाजूला इंडिया पोस्ट असं लिहिलं आहे. यावरून हा SMS भारतीय पोस्टकडून आलाय असा ग्रह होऊ शकतो. त्यानंतर 'तुमचं पॅकेज हे वेअरहाऊसमध्ये आलं आहे. आम्ही तुमच्या पत्तावर दोनवेळा पार्सल देण्याचा प्रयत्न केला. मात्र पत्ता पूर्ण नसल्यानं आम्ही हे पार्सल तुमच्यापर्यंत पोहचवू शकलो नाही.'
या SMS मध्ये पुढं लिहिलं आहे की, 'तुम्ही तुमचा पत्ता ४८ तासात अपडेट करा नाहीतर हे पॅकेज परत जाईल' त्यानंतर खालील दिलेल्या लिंकवर तुमचा पत्ता अपडेट करा असं सांगितलं आहे. शेवटी पत्ता अपडेट केल्यानंतर आम्ही तुमचं पार्सल हे २४ तासाच्या आत पोहच करू असं लिहिलं आहे. हा एक फ्रॉड SMS आहे त्यामुळं अशा लिंकवर चुकूनही क्लिक करू नका!