पुणे: राजबहादूर मिल परिसरातील किकी पबमध्ये फ्रेशर्स पार्टीच्या नावाखाली विद्यार्थ्यांना मद्यपुरवठा केला जात असल्याच्या संशयातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांनी उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्यांच्या मदतीने पार्टी उधळून लावली. याबाबतचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत.
शनिवारी (दि. 23) सायंकाळी पाचपासून नामांकित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ही पार्टी आयोजित केली होती. या पार्टीला शेकडो तरुण-तरुणी सहभागी झाल्या होत्या. त्यांच्याकडे कोणतेही ओळखपत्र न पाहता प्रवेश देऊन दारू तसेच सिगारेट पुरवठा केला जात असल्याचे या कारवाईवेळी आढळले. पब प्रशासनाने तेथे आलेल्यांची कोणतिही नोंद ठेवली नसल्याची माहितीही समोर आली. (Latest Pune News)
मनसे विद्यार्थी सेनेचे विभागाध्यक्ष हेमंत बोळगे यांच्या म्हणण्यानुसार, पब चालकांनी शासनाच्या नियमांची पायमल्ली केली आहे. मुलांना दारू पाजण्याचा हा थेट प्रकार या ठिकाणी सुरू असल्याचे निदर्शनास आले. या कारवाईत शहराध्यक्ष धनंजय दळवी यांच्या नेतृत्वाखाली मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते. पोलिसांकडून या आयोजित पार्टीची चौकशी करण्यात आली.
यापूर्वीच, मागील आठवड्यात मुंढवा परिसरातील एका हॉटेलबाहेरही धिंगाणा उडाला होता. स्थानिक नागरिक आणि हॉटेल प्रशासनामध्ये जोरदार बाचाबाची झाली होती. त्या घटनेची आठवण ताजी नसतानाच आता किकी पबमधील प्रकाराने पुण्यातील पब संस्कृतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. रविवारी रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.