पुणे: पावसाने उघडीप दिल्यानंतर शेतकर्यांनी शेतमालाची मोठ्या प्रमाणात तोड करून शेतमाल बाजारात विक्रीसाठी पाठविला. परिणामी, गुलटेकडी मार्केट यार्डातील तरकारी विभागात रविवारी राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे 100 ट्रक फळभाज्यांची आवक झाली. बाजारात दाखल झालेल्या मालाला अपेक्षित उठाव राहिला नाही.
गाजर वगळता सर्व फळभाज्यांचे भाव गत आठवड्याच्या तुलनेत स्थिर राहिले. मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्यामुळे गाजराच्या भावात दहा टक्क्यांनी वाढ झाल्याचे सांगण्यात आले. (Latest Pune News)
परराज्यांतून झालेल्या आवकमध्ये कर्नाटक, गुजरात, उत्तर प्रदेश येथून हिरवी मिरची 10 ते 12 टेम्पो, इंदौर येथून गाजर 9 ते 10 टेम्पो, कर्नाटक येथून कोबी 4 ते 5 टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून शेवगा 4 ते 5 टेम्पो, कर्नाटक येथून पावटा 3 ते 4 टेम्पो, तामिळनाडू येथून तोतापुरी कैरी 50 क्रेटस, कर्नाटक येथून घेवडा 3 ते 4 टेम्पो, गुजरात येथून भुईमूग शेंग 4 ते 5 टेम्पो, मध्यप्रदेश येथून लसणाची सुमारे 9 ते 10 टेम्पो तर इंदौर, आग्रा, स्थानिक भागातून बटाटा 30 ते 35 टेम्पो इतकी आवक झाली होती.
स्थानिक भागातून झालेल्या आवकमध्ये सातारी आले सुमारे 400 ते 500 गोणी, भेंडी 5 ते 6 टेम्पो, गवार 4 ते 5 टेम्पो, टोमॅटो 10 हजार क्रेटस, हिरवी मिरची 3 ते 4 टेम्पो, काकडी 7 ते 8 टेम्पो, फ्लॉवर 10 टेम्पो, कोबी 7 ते 8 टेम्पो, ढोबळी मिरची 10 ते 12 टेम्पो, शेवगा 2 ते 3 टेम्पो, भुईमुंग शेंग 125 गोणी, मटार 500 ते 600 गोणी, तांबडा भोपळा 10 ते 12 टेम्पो, कांदा सुमारे 100 ट्रक इतकी आवक झाली.
पालेभाज्यांच्या मागणीत वाढ
मार्केट यार्डात पालेभाज्यांची आवक मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहे. पावसाने उघडीप दिल्यानंतर पालेभाज्यांना मागणी वाढली आहे. तरीही मेथी वगळता सर्व पालेभाज्यांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत. मेथीच्या भावात मात्र मागील आठवड्याच्या तुलनेत भावात 10 टक्क्क्यांनी वाढ झाली आहे. घाऊक बाजारात मेथीच्या जुडीला दर्जानुसार 12 ते 20 रुपये भाव मिळत आहे. येथील घाऊक बाजारात रविवारी (दि. 24) कोथिंबिरीची सुमारे 1 लाख 50 हजार जुडी, तर मेथीची 80 हजार जुडींची आवक झाली होती. ही आवक मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहे.