जेजुरी: तीर्थक्षेत्र जेजुरीत 1868 साली नगरपालिका स्थापन झाली. राज्यकर्त्यांनी लक्ष न दिल्याने जेजुरी नगरी विकासापासून दुर्लक्षित राहिली. संकुचित वृत्तीचे लोक सत्तेत राहिल्याने शहराचा विकास होऊ शकला नाही. येत्या चार ते पाच वर्षांत जेजुरी शहराचा कायापालट होईल, असे प्रतिपादन आमदार विजय शिवतारे यांनी केले.
जेजुरी (ता. पुरंदर) गडाच्या पायथ्याशी सुमारे 11 कोटी 60 लाख रुपये खर्चाचे भक्तनिवास व पार्किंग व्यवस्था तसेच शहरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदार शिवतारे यांच्या हस्ते शनिवारी (दि. 5) करण्यात आले. यानिमित्त मल्हार नाट्यगृहात आयोजित जनसंवाद कार्यक्रमात शिवतारे बोलत होते. (Latest Pune News)
शिवतारे म्हणाले की, राज्यातील सर्व तीर्थक्षेत्रांचा विकास झाला. मात्र, जेजुरीच्या विकासाकडे राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष झाले. 2018 साली जेजुरी तीर्थक्षेत्र विकास आराखडा मांडला. 2022 साली तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 349 कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी दिली. 109 कोटी रुपयांची कामे सुरू झाली. शहरासाठी वीर धरणावरून पिण्याच्या पाण्यासाठी 78 कोर्टीची योजना मंजुरी झाली. लवकरच या योजनेचे काम सुरू होत आहे.
जेजुरी शहराबाहेर असणारी सरकारी कार्यालये शहराच्या मध्यवर्ती भागात सुरू करणे, शहरातून उड्डाणपूल करणे, आठवडे बाजारात पेव्हिंग ब्लॉक बसविणे, तांत्रिक विद्यालयाच्या जागेत आयटी पार्क सुरू करणे आदी कामे प्रस्तावित आहेत. शहराचा चेहरामोहरा बदलणार असल्याचे शिवतारे यांनी सांगितले.
मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले यांचे काम उत्कृष्ट आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक वाकचौरे यांनी येथील कायदा व सुव्यवस्था चांगली ठेवली आहे, असेही त्यांनी सांगितले.या जनसंवाद अभियानात नागरिकांनी आपली गार्हाणी मांडली.प्रास्ताविकात जेजुरी शिवसेनेचे प्रमुख विठ्ठल सोनवणे यांनी नागरिकांचे प्रश्न उपस्थित केले.
या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दिलीप यादव, अॅड. नितीन कुंजीर, हरिभाऊ लोळे, दादा थोपटे, नितीन पोटे, माजी नगराध्यक्ष मनोहर भालेराव, लता दोडके, गणेश गाढवे, कल्पेश राऊत, गणेश भोसले आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन इरफान बागवान यांनी केले.