
Maharashtra NCP news today
शिवनगर: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचार सभेत दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. तुम्ही माझ्या विचारांचे संचालक मंडळ बहुमताने निवडून दिले आहे. तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
माळेगाव कारखान्याच्या अध्यक्षपदी शनिवारी (दि. 5) अजित पवार यांची निवड झाल्यानंतर झालेल्या सभेत पवार बोलत होते. या वेळी माजी अध्यक्ष अॅड. केशवराव जगताप, बाळासाहेब तावरे, उपाध्यक्षा संगीताताई कोकरे, संचालक योगेश जगताप, नितीन सातव, शिवराज जाधवराव, तानाजी कोकरे, स्वप्निल जगताप, अविनाश देवकाते, राजेंद्र बुरुंगले, सतीश फाळके, गणपत खलाटे, विजय तावरे, प्रताप आटोळे, जयपाल देवकाते, नितीन शेंडे, देविदास गावडे, विलास देवकाते, रतनकुमार भोसले, दत्तात्रेय, ज्योती मुलमुले, कार्यकारी संचालक अशोक पाटील आदींसह सभासद बहुसंख्येने उपस्थित होते. (Latest Pune News)
अजित पवार म्हणाले, कारखान्याच्या निवडणूक प्रचारादरम्यान कबूल केल्याप्रमाणे निरा नदी प्रदूषणाचा प्रश्न, खराब पाण्याचा प्रश्न, डिस्टिलरी क्षमता, वीजनिर्मिती प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालवणे, जास्तीचे साखर उत्पादन घेऊन दर्जेदार साखरनिर्मिती करणे आदी बाबींकडे तातडीने लक्ष देऊन सुधारणा करणार आहे. यासाठी व्हीएसआयच्या तज्ज्ञ मंडळींचा वेळोवेळी सल्ला घेतला जाईल.
दुसरीकडे सभासदांच्या उसाचे उत्पादन वाढवण्यासाठी एआय टेक्नॉलॉजीचा प्रभावीपणे वापर करणे तसेच सभासदांच्या आरोग्यासाठी शासन तसेच इतर स्तरावर विमा पॉलिसी तयार करणे, ठिबक सिंचनासाठी जिल्हा बँकेच्या माध्यमातून कारखाना हमीवर थेट सभासदांच्या नावे कर्ज घेण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले. मी शब्दाचा पक्का आहे, दिलेला शब्द पाळतो अशी माझी राज्यात ख्याती आहे त्यामुळे माळेगावकरांनी निवडणुकीच्या माध्यमातून टाकलेला विश्वास सार्थ करणार असल्याचे अजित पवार यांनी नमूद केले.
शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे विश्वस्त
माळेगाव कारखाना संचालित शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी तहयात खा. शरद पवार आहेत. त्यामुळे त्यांनी तीन विश्वस्तांची नावे दिली आहेत. यामध्ये अॅड. एस. एन. जगताप, अॅड. राजेंद्र काटे, रोहन देवकाते आदींचा समावेश आहे. उर्वरित तीन नावे मी देणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
अॅड. केशवबापूंचा मोठेपणा
माळेगाव साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री अजित पवार विराजमान झाल्यानंतर झालेल्या जाहीर सभेवेळी माजी अध्यक्ष अॅड. केशवबापू जगताप यांनी सभेसमोरील उपस्थित जनसमुदायात बसणे पसंत केले. त्यामुळे एकूणच त्यांच्या मनाचा मोठेपणा दिसल्याची चर्चा उपस्थितांत होती.