खोर; पुढारी वृत्तसेवा : 'आपला कारखाना सहकारी असल्यानेच सर्वसाधारण सभेला सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे. जो मला मतदान करीत नाहीत, त्याचीदेखील इच्छा आहे की भीमा-पाटस कारखाना व्यवस्थित चालावा. त्यामुळे कारखान्यावर बोट ठेवून कोणीही राजकारण करू नये, कारण हे संसाराचे ठिकाण आहे,' असे प्रतिपादन भीमा-पाटस सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, आमदार अॅड. राहुल कुल यांनी केले आहे. भीमा -पाटस कारखाना येत्या 1 नोव्हेंबर रोजी सुरू होत आहे. 40 व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन कार्यकम आ. राहुल कुल व त्यांच्या पत्नी कांचन यांच्या हस्ते पार पडला, त्या कार्यक्रमात आ. कुल बोलत होते.
आ. राहुल म्हणाले, की दिवंगत मधुकाका शितोळे व सुभाष कुल यांचे कारखान्याच्या जडणघडणीत मोठे योगदान आहे. केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या योगदानातून भीमा-पाटस कारखाना सुरू करण्याच्या बाबतीत मार्गदर्शन लाभले. निराणी ग्रुपच्या माध्यमातून हा कारखाना सुरू करण्यास सहकार्य मिळाले.
कारखाना गुंतवणूक करून तीन वेळा टेंडर होऊनही कोणी पुढे आले नाही, मात्र निराणी ग्रुपने पुढाकार घेऊन कारखाना सुरू केल्याने परिसरातील शेतकर्याला सुगीचे दिवस आले आहेत. 'साई प्रिया की निराणी ग्रुप' हा विषय महत्त्वाचा नसून, कारखाना सुरू होणे गरजेचे होते. मागील हंगामात कमी कालावधीत 3 लाखांपर्यंत गाळप करण्यात आले. या वर्षीदेखील 10 लाख मे. टनांपर्यंत साखर कारखाना गळीत करण्याचा मानस आहे. चांगल्या प्रकारे बाजारभाव देऊन ऊस उत्पादक शेतकरीवर्गाला अडचणी येऊ देणार नाही.
कार्यकारी संचालक रविकांत पाटील म्हणाले, की भीमा-पाटसचे 5 हजारांपासून ते 10 हजारांपर्यंत विस्तारीकरण करण्यात आले आहे. 1 तारखेला कारखाना सुरू होणार आहे. निराणी ग्रुपचे संस्थापक मृगेश निराणी, संगमेश निराणी, विशाल निराणी यांचे मार्गदर्शन लाभत आहे. उसाला चांगला बाजारभाव देऊन वेळेत पगार देण्याचा आमचा मानस असून, ऊस उत्पादक शेतकर्यांना चांगले दिवस आज आ. राहुल कुल व निराणी ग्रुप यांच्या माध्यमातून आले आहेत.
कामगार संघटनेचे अध्यक्ष अर्जुन दिवेकर म्हणाले, की कारखान्याने कामगारांना 12 टक्के पगारवाढ दिली आहे. 18 वर्षांपासून प्रलंबित असलेला ग्रेडेशनचा विषय लवकरात लवकर मार्गी लावावा. दिवाळीच्या 8 दिवस आधी बोनस देऊन तो खात्यावर जमा करावा. 30 वर्षे ज्या कामगारांनी रोजंदारीवर काम केले आहे, अशा कामगारांना कारखान्यावर कायम करण्यात यावे.
हनुमंत वाबळे, नंदू पवार यांनी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी माजी आमदार रंजना कुल, भीमा-पाटसचे उपाध्यक्ष नामदेव बारवकर, बाजार समितीचे सभापती गणेश जगदाळे, भाजप तालुकाध्यक्ष हरिश्चंद्र ठोंबरे, संचालक मंडळ, कामगार व सभासद वर्ग उपस्थित होता. कारखान्याचे संचालक विकास शेलार यांनी सूत्रसंचालन व प्रास्ताविक केले. कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेव बारवकर यांनी आभार मानले आहे.
हेही वाचा