

पुणे: वाहतूक सुरळीत करण्यासाठी मित्रमंडळ चौक ते पर्वती यादरम्यानचा रस्ता रुंद केला खरा; पण रुंद करण्यात आलेल्या या मार्गावर दुतर्फा वाहने उभी करण्यात येत असल्याने रुंदीकरणाच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला गेला आहे.
या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी गोंदवलेकर महाराज मठालगतच्या ओढ्यावरील कल्व्हर्टवजा पुलाचे रुंदीकरण करण्यात आले. पुलाच्या रुंदीकरणामुळे हा रस्ता वाहतूक कोंडीमुक्त होईल, अशी अपेक्षा केली जात असतानाच रुंदी झालेल्या या पुलावरच दुतर्फा मोटारी उभ्या करण्यात येत असल्याने या रुंदीकरणाचा हेतूच फोल ठरल्याचे येथील व्यावसायिकांनी सांगितले.
या रस्त्यावर एका बाजूला पेशवेकालीन शंकराचे मंदिर आहे. त्यापुढे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने उभारलेले गणपतीचे मंदिर आहे. तर, दुसऱ्या बाजूला गोंदवलेकर महाराज मठ आहे. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या गाड्या रस्त्यावरच लागतात. या मठालगतच मिरवणुकीसाठी वापरण्यात येणारा एक रथ ठेवण्यात आला असून, वापरात नसलेल्या चारचाकी गाड्याही या पुलावरच वाहतुकीला अडथळा करीत उभ्या केलेल्या दिसतात. काही वाहनांना तर वाहनमालकांनी कव्हरही घातले आहेत.
या बेकायदा वाहनतळाविरुद्ध स्थानिक पोलिसांना अनेकदा तक्रारी केल्या. वाहतूक विभागालाही कळविले, तरी त्यांच्याकडून अद्याप काहीही कारवाई झाली नसल्याचे या परिसरातील रहिवासी प्रकाश कुलकर्णी यांनी दै. 'पुढारी'शी बोलताना सांगितले. पोलिसांच्या पीटीपी ॲपवर याबाबत माहिती दिली तरी परिस्थितीत सुधारणा झाली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी या रस्त्यावर लवकरच पी-१ व पी-२ फलक लावण्यात येतील. त्यामुळे वाहनचालकांना सम-विषम तारखेनुसार रस्त्याच्या एका बाजूलाच वाहने उभी करणे शक्य होईल. परिणामी, वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल तसेच डबल पार्किंग, रस्ता अडवून उभे करण्यात येणारे रथ आणि कव्हर घालून उभ्या केलेल्या गाड्या पोलिस क्रेनद्वारे उचलण्यात येतील.
संदीप भाजीभाकरे, पोलिस उपायुक्त, पुणे शहर पोलिस वाहतूक विभाग