

Police Constable Allegations on Indapur PI
इंदापूर: पुणे ग्रामीण पोलीस दलात एक खळबळजनक घटना घडली आहे. पुणे ग्रामीण पोलीस दलातील कर्मचारी पोलीस हवालदार विष्णू केमदारणे आज (दि.१०) सकाळी पहाटेपासून इंदापूर पोलिस ठाण्याच्या शासकीय वसाहतीतून बेपत्ता झाले आहेत. केमदारणे यांनी लिहिलेली एक चिठ्ठी समोर आली असून या चिठ्ठीतून त्यांनी इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्यासह अन्य दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत.
मागील दोन महिन्यांपासून पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी पोलीस हवालदार रासकर आणि पोलीस कॉन्स्टेबल सूर्यवंशी यांच्या सांगण्यावरून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. तुझी नोकरी व यापुढील आयुष्य हे उद्ध्वस्त करून टाकेल, अशी भाषा वापरून मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे, असे या चिठ्ठीत लिहिले आहे.
विष्णू केमदारणे यांनी त्यांच्या पत्नीच्या मोबाईलवर एक कॉल रेकॉर्डिंग ऑडिओ देखील पाठवलेला आहे. आणि माझ्या या अवस्थेला होणाऱ्या परिणामांना पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे हेच जबाबदार आहेत, असे म्हटले आहे.
या संपूर्ण खळबळजनक घटनेनंतर इंदापूर पोलीस ठाण्यात विष्णू केमदारणे यांच्या पत्नी प्रियंका केमदारणे यांनी आपले पती हरवल्याची तक्रार देखील दाखल केली आहे. खात्या व्यतिरिक्त तुम्ही माझ्या पतीला वैयक्तिक धमकी का देताय, माझ्या पतीला न्याय मिळाला पाहिजे, अन्यथा मी माझ्या मुलाबाळांसह इंदापूर पोलीस ठाण्यासमोर जीवन संपवेन, असा इशारा प्रियंका यांनी दिला आहे.